महसुल विभागाला लागले रिक्त पदांचे ग्रहण
By admin | Published: April 10, 2015 01:30 AM2015-04-10T01:30:42+5:302015-04-10T01:30:42+5:30
तालुक्यात शासकीय कामात नेहमी कोणती न कोणती समस्या भेडसावत असते.
सालेकसा : तालुक्यात शासकीय कामात नेहमी कोणती न कोणती समस्या भेडसावत असते. त्याचा थेट परिणाम तालुक्यातील भोळ्या जनतेच्या कामावर होत असते. सध्या महसुल विभागात रिक्त पदाचे ग्रहण लाभले असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
सर्वात महत्वाचे पद म्हणजे अव्वल कारकून आणि कनिष्ठ लिपिकाचे आहे. मात्र त्यांचे निम्मे पद रिक्त असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. यातून कोणतेही काम व्यवस्थित होताना दिसत नाही. याचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर लोकांना बसत आहे.
तहसील कार्यालयाचे कर्णधार, अर्थात तहसीलदारांचे पद आजघडीला रिक्त आहे. नायब तहसीलदाराची चार पदे मंजूर असून एक पद रिक्त आहे. तहसीलदार सुनिल सुर्यवंशी परिविक्षाधीन कालावधी अंतर्गत येथे कार्यरत होते. त्यांचे पद उपजिल्हाधिकारी म्हणून होते. त्यांना उपविभागीय अधिकारी बनविण्यात आले. त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली असून नायब तहसीलदार आर.एम. कुंभरे यांना प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे चार नायब तहसीलदाराचे काम दोन लोक सांभाळत आहेत.
अव्वल कारकुनाची सहा पदे मंजूर असून चार पद रिक्त आहेत. उर्वरीत दोनपैकी एक कारकून मागील सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी एसडीओ कार्यालय देवरी येथे कामात सहकार्य करण्यासाठी पाठविण्यात आले होते. परंतु ते कारकून व्ही.सी. लाडे सालेकसा परत आलेच नाही किंवा आतापर्यंत त्यांना तिथून कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे सहा पैकी फक्त एकच अव्वल कारकुन आय.डी. साखरे अनेक जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.
कनिष्ठ लिपिकाची एकूण १० पदे मंजूर असून त्यापैकी तीन पदे रिक्त आहेत. त्यामुळे काही लिपिकांना दोन दोन टेबलाची जवाबदारी देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)