मुंडीपार घाटावर महसूल विभागाची धडक कारवाई ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:30 AM2021-05-09T04:30:01+5:302021-05-09T04:30:01+5:30
बटाना, मुंडीपार व आंभोरा घाटांत मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी मागील काही दिवसांपासून सुरू होती. यासंदर्भात महसूल विभागाकडे तक्रार ...
बटाना, मुंडीपार व आंभोरा घाटांत मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी मागील काही दिवसांपासून सुरू होती. यासंदर्भात महसूल विभागाकडे तक्रार करूनसुध्दा त्याची दखल घेण्यात आली नव्हती. ‘लोकमत’मध्ये यासंदर्भातील वृत्त प्रकाशित होताच महसूल विभाग जागा झाला. शनिवारी सकाळीच मुंडीपार, कामठा मार्गावरील पांगोली नदीच्या घाटावर धाड टाकण्यात आली. त्यात विनानंबर प्लेट असलेला एक ट्रॅक्टर अवैध मार्गाने वाळू वाहून नेत असताना पकडण्यात आला. या कारवाईत नायब तहसीलदार पालांदूरकर यांच्या मार्गदर्शनात खमारी मंडळ अधिकारी रघुवंशी, नवरगाव कलाचे तलाठी नितीन बुचे, आसोलीचे तलाठी अशोक आडे, तलाठी अमित बडोले, मुंडीपारचे पोलीसपाटील ओमप्रकाश ठाकूर यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. महसूल विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू चोरांचे धाबे दणाणले आहे.