कर्मचारी घेणार मोहरीरच्या कामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 09:40 PM2019-01-03T21:40:39+5:302019-01-03T21:41:11+5:30
यंदा ८० टक्के मालमत्ता कर वसुली व्हावी यासाठी नगर परिषदेने प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे मोहरीरची (कर वसुली अधिकारी) जबाबदारी टाकली आहे. यांतर्गत संबंधीत कर्मचाऱ्याला त्यांना देण्यात आलेल्या मोहरीरकडून वसुली करवून घ्यावयाची असून रोजच्या कामावर नजर ठेवायची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा ८० टक्के मालमत्ता कर वसुली व्हावी यासाठी नगर परिषदेने प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे मोहरीरची (कर वसुली अधिकारी) जबाबदारी टाकली आहे. यांतर्गत संबंधीत कर्मचाऱ्याला त्यांना देण्यात आलेल्या मोहरीरकडून वसुली करवून घ्यावयाची असून रोजच्या कामावर नजर ठेवायची आहे.नगर परिषदेने हा नवा प्रयोग अंमलात आणला असून यामुळे मालमत्ता कर वसुलीत किती वाढ होते हे लवकरच दिसून येईल.
मागील वर्षी ४८ टक्केच्या घरात मालमत्ता कर वसुली झाली होती.नगर परिषदेला मालमत्ता कर वसुली हेच मोठे आर्थिक स्त्रोत असून एवढी कमी वसुली झाल्याने नगर परिषदेची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे यंदा तरी किमान ८० टक्के कर वसुली व्हावी, यासाठी नगर परिषदेने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी ४ कोटी ८६ लाख ६५ हजार ३१७ रूपये व चालू मागणी ४ कोटी ४८ लाख ७९ हजार १३१ रूपये असे एकूण ९ कोटी ३५ लाख ४४ हजार ४४८ रूपये मालमत्ताकर वसुलीचे टार्गेट आहे.
आतापर्यंत कर विभागातील मोहरीर वसुली करून आणत होते व त्यानुसार मालमत्ता कर वसुलीचा कामकाज चालत होते. यात काही बदल व्हावा व मोहरीरवर वसुलीसाठी वचक रहावे यासाठी नगर परिषदेने कर्मचाºयांना एक-दोन मोहरीर जोडले आहेत. या कर्मचाºयांना त्यांना जोडलेल्या मोहरीरच्या कामावर लक्ष द्यायचे आहे.त्यांनी वसुलीसाठी काय केले, काय करणे अपेक्षीत आहे यासह वसुलीसाठी आवश्यक ते सहकार्य करून मोहरीरच्या कामावर लक्ष द्यायचे आहे. नगर परिषदेच्या या प्रयोगामुळे मोहरीरही कामाला लागल्याचे दिसून येत आहे. शिवाय कर्मचाऱ्यांवर जबाबदारी असल्याने तेही मोहरीरकडून दररोज केलेल्या कामाबाबत जाणून घेत आहेत. नगर परिषदेचा हा प्रयोग चांगला दिसून येत असून अशाचप्रकारे जबाबदारीने काम सुरू राहिल्यास नक्कीच ८० टक्के मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट सर करणे अशक्य नाही.
पथकाचे गठन व मोहरीरला दिले पत्र
यंदा ८० टक्के मालमत्ताकर वसुलीचे टार्गेट असल्याने मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्या निर्देशावरून प्रशासनीक अधिकारी सी.ए.राणे यांनी मोहरीरला पत्र देऊन ८० टक्के टार्गेट पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. एवढेच नव्हे तर कर वसुलीसाठी कर विभागाने ८ जणांचे पथक गठीत केले आहे. हे पथक आता कर वसुलीसाठी निघणार आहे.