कराचे फेरमूल्यांकन सुरू होणार

By admin | Published: February 22, 2016 01:50 AM2016-02-22T01:50:58+5:302016-02-22T01:50:58+5:30

शहरातील मालमत्तांच्या फेर कर मूल्यांकनाच्या कामाला आता पुन्हा लवकरच सुरूवात होणार आहे.

The revised tax assessment will begin | कराचे फेरमूल्यांकन सुरू होणार

कराचे फेरमूल्यांकन सुरू होणार

Next

कपील केकत गोंदिया
शहरातील मालमत्तांच्या फेर कर मूल्यांकनाच्या कामाला आता पुन्हा लवकरच सुरूवात होणार आहे. कारण या कामाला घेऊन नगर परिषदेच्या विशेष आमसभेत आवश्यक ती चर्चा झाली असून काम करणाऱ्या कंपनीला नवे दर देण्यास मंजूरी मिळाली आहे. यासाठी अध्यक्षांनी तीन सदस्यांची समिती गठित केली असल्याची माहिती असून प्रती मालमत्ता दर निश्चित होताच या कामाला सुरूवात होणार असल्याचे दिसून येत आहे.
शहरात असलेल्या मालमत्तांकडून कर स्वरूपात येणारी रक्कम हीच नगर परिषदेची मुख्य आवक आहे. शिवाय यावरच शासनाकडून मिळणारे अनुदानही ठरविले जाते. अशात नगर परिषदेच्या हद्दीतील मालमत्तांचे कर मुल्यांकन करणे गरजेचे असते. मात्र शहरातील सुमारे ४० टक्केच्या घरात मालमत्तांचे कर मुल्यांकन झालेले नसल्याची माहिती आहे. अशात या मालमत्तांकडून कर मिळत नसल्याने याचा फटका नगर परिषदेला बसत आहे. याकरिता शहरातील मालमत्तांचे फेर कर मुल्यांकन करण्याचे काम नगर परिषदेने सुरू करविले होते.
शहरातील मालमत्तांचे फेर कर मुल्यांकन व्हावे यासाठी नगर परिषदेकडून २४ डिसेंबर २०१० रोजी अमरावतीच्या स्थापत्य कन्सलटन्स प्रा.ली. या एजंसीला काम देण्यात आले होते. त्यावेळी प्रती मालमत्ता २७४ रूपये या दराने एजंसी सोबत करार झाला होता. तेव्हा एजंसीने शहरातील १४ वॉर्डांचे प्राथमिक सर्वेक्षण केले होते. तर करारनाम्या प्रमाणे काही प्रमाणात पेमेंट करण्याची मागणी कंपनीकडून करण्यात आली होती. मात्र आर्थिक तरतूदी अभावी नगर परिषदेने एसंजीला पैसे न दिल्याने एजंसीने काम बंद केले होते.
दरम्यान २८ सप्टेंबर २०१५ रोजी नगर परिषदेने एजंसीला २३ लाख ७४ हजार ४४७ रूपयांचे पेमेंट केले. यावर एजंसीने १४ वॉर्डांचे पूर्वी केलेले प्राथमिक सर्वेक्षण अद्ययावत करण्याचे काम पूर्ण केले. मात्र फेर कर मुल्यांकनाच्या कामाचा कार्यादेश सन २०१० चा असून तेव्हा करार करण्यात आलेल्या २७४ रूपयांच्या दराने पुढील काम त्याच दरात आता करणे आर्थिक दृष्टया शक्य नसल्याचे एजंसीकडून कळविण्यात आले. तसेच यासाठी नगर परिषदेने नव्या दराने काम मंजूर करून पुढील काम करण्यास आदेश द्यावा असे पत्र एजंसीकडून २१ जानेवारी रोजी नगर परिषदेला पाठविले. या पत्रासह एजंसीने दोन महानगर पालिका व चार नगर परिषदांच्या कंत्राटाचे दर वर्ष निहाय पुराव्यासह नमूद करून पाठविले. त्यात नगर परिषद उस्मानाबाद (अ-वर्ग) चा सन २०१५ चा ४९५ रूपये व प्रत्यक्ष दर ४९२ रूपयांचा करार निश्चीत असल्याचा मुख्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीचा पुरावा एजंसीकडून जोडण्यात आला आहे.
यावर नगर परिषदेने शनिवारी (दि.२०) घेतलेल्या विशेष आमसभेत हा विषय मांडून त्यावर चर्चा केली. यामध्ये फेर कर मुल्यांकनाचे काम करावयाचे असल्याने नवे दर देण्यास मंजूरी दर्शविण्यात आली असून उस्मानाबाद नगर परिषदेच्या प्रती मालमत्ता दरादरम्यानचे दर निश्चीत करणे योग्य राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नगर परिषदेने एकदा दर निश्चीत केल्यानंतर तसा कार्यादेश एजंसीला देण्यात येणार व फेर कर मुल्यांकनाचे काम पुन्हा शुरू होणार असल्याचे दिसून येत आहे. यातून नगर परिषदेची आवक वाढून शहरातील विकासकामे होणार.

नागरी सुविधा केंद्र व विद्युत विभागावर चर्चा
विशेष आमसभेत फेर कर मुल्यांकनाच्या विषयासह नागरी सुविधा केंद्र तसेच विद्युत विभागातील विषयांवर चर्चा करण्यात आली. नागरी सुविधा केंद्रांतर्गत फेयरवेल वीथ एसएसएल सर्टिफि केट खरेदीसाठी येणाऱ्या खर्चाला १३ व्या वित्त आयोगातून पेमेंट करण्याचा विषय घेण्यात आला. तसेच सेवा हमी कायद्यांतर्गत पेमेंट गेटवेची सेवा सुरू करण्याकरिता खाते उघडण्याबाबतच्या विषयावर चर्चा करण्यात आली. याशिवाय टाऊन शाळेवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी सातारा येथील ओम एंटरप्राईजेस यांना दिलेला कार्यादेश रद्द करून पुन्हा निविदा टाकण्याचा विषय घेण्यात आला. तर नगर परिषद क्षेत्रांतर्गत असलेल्या पथदिव्यांचे विद्युत देयक १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली.

Web Title: The revised tax assessment will begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.