नॅशनल पब्लिक इंग्लिशची मान्यता रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:33 AM2021-09-24T04:33:48+5:302021-09-24T04:33:48+5:30
गोंदिया : ऑक्सफोर्ड शिक्षण संस्थेद्धारा संचालित नॅशनल पब्लिक स्कूल पिंडकेपार या शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी विजय गणवीर यांनी ...
गोंदिया : ऑक्सफोर्ड शिक्षण संस्थेद्धारा संचालित नॅशनल पब्लिक स्कूल पिंडकेपार या शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी विजय गणवीर यांनी केली आहे. या संदर्भातील तक्रार त्यांनी शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांच्याकडे केली असून त्यांनी याप्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश गोंदिया शिक्षण विभाग व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे.
विजय गणवीर यांनी केलेल्या तक्रारीनुसार ऑक्सफोर्ड शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी यांनी स्व. रामप्रसाद पांडुरंग गणवीर यांच्या शेतीचेे सातबारा आणि घर टॅक्स पावत्या काढून व बोगस कागदपत्रे जोडून शाळेचा प्रस्ताव सादर केल्याचा आरोप केला आहे. ही बाब माहितीच्या अधिकारांतर्गत उघडकीस आली. विजय गणवीर यांनी जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तक्रार केली. त्याचीच दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश गोंदिया शिक्षण विभागाला दिले. याची चाैकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी गोंदियाचे गटशिक्षणाधिकारी राऊत यांची नियुक्ती केली. मात्र राऊत हे मागील दोन महिन्यांपासून अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप गणवीर यांनी केला आहे. याप्रकरणाचा अहवाल सादर करण्यास शिक्षण विभागाकडून हेतूपुरस्पर विलंब केला जात असल्याने या संस्थेवर कारवाई करण्यास विलंब होत आहे. शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांनी ८ सप्टेंबर रोजी गोंदिया पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राऊत यांना पत्र देऊन त्यांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालात मुद्दे निहाय माहिती नसल्याने याप्रकरणाची सखोल चौकशी करुन पुन्हा अहवाल सादर करण्याचे पत्र दिले आहे. मात्र यानंतरही अहवाल सादर करण्यास विलंब केला जात असल्याचा आरोप गणवीर यांनी केला आहे. शिक्षण विभागाने याप्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल त्वरित सादर करण्याची मागणी विजय गणवीर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शिक्षण मंत्र्यांकडे सुध्दा तक्रार केली आहे.