जिल्हा परिषद शाळांमध्ये येणार क्रांती
By admin | Published: February 16, 2017 12:50 AM2017-02-16T00:50:23+5:302017-02-16T00:50:23+5:30
जिल्हा परिषद शाळासुद्धा आता खासगी संस्थांच्या शाळांशी टक्कर देण्याच्या तयारीत आहेत.
सी.एल. पुलकुंडवार : व्यवस्थापन समितीच्या १० हजार सदस्यांना पाठविले पत्र
गोंदिया : जिल्हा परिषद शाळासुद्धा आता खासगी संस्थांच्या शाळांशी टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक क्रांती घडविण्याचे प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यात डिजिटल स्कूल, अध्ययन कुटी व प्रगतीशील अभियानानंतर आता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारद्वारे जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समितीच्या १० हजार सदस्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार यांच्यानुसार, गावातील मुलांची शंभर टक्के नोंदणी, शंभर टक्के उपस्थिती, शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व त्यांना टिकवून ठेवणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शाळा निर्माण व दुरूस्तीदेखभाल करणे, शिक्षकांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे आदी महत्वपूर्ण कामांची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीद्वारे सांभाळली जात आहे. जिल्हा परिषद शिक्षकांद्वारे विविध नवीन उपक्रम आयोजित केले जात आहेत. यापैकीच एक म्हणजे लोकसहभागातून शाळा डिजिटल अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिकतर शाळा फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत डिजिटल होत आहेत. अनेक शिक्षकांद्वारे व्ययक्तीक स्तरावर, विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत आवड निर्माण करण्यासाठी नवीन उपक्रम राबविले जात आहेत.
डॉ. पुलकुंडवार यांच्यानुसार, जिल्ह्यातील शाळांच्या निरीक्षणप्रसंगी अनेक शाळांतील विद्यार्थी योग्यरित्या पाठ्यपुस्तके वाचू शकत नाही, ही बाब समोर आली. विद्यार्थी ज्या वर्गात शिकतात, त्या वर्गाच्या पुस्तके त्यांना योग्यरिता वाचता येणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना बेरीज-वजाबाकी यायला हवी. लहान बालकांमध्ये जर भाषा विषयाचे आकलन करण्यात आले नाही तर इतर सर्व विषयांचे आकलन करण्यात समस्या होवू शकते, सर्व विद्यार्थी शैक्षणिक दृष्टीने सक्षम होण्यात बाधा येवू शकते. आपल्या बालकांना चांगले शिक्षण देवून त्यांना सक्षम बनविणे, मुलगा आपल्या पायांवर उभा राहून आपल्या कुटुंबाचा आधार बनावा, अशी सर्व आई-वडिलांची अपेक्षा असते. परंतु बालकांच्या शैक्षणिक विकासाविना कोणत्याही प्रकारच्या भौतिक विकासाचे महत्व नाही. यासाठी आई-वडिलांनी आपल्या बालकांच्या अभ्यासाप्रती जागृत राहणे गरजेचे आहे, असे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार म्हणाले. (प्रतिनिधी)