गाण्याच्या तालावर रोवणी सुरू
By Admin | Published: August 7, 2016 12:54 AM2016-08-07T00:54:52+5:302016-08-07T00:54:52+5:30
दमदार पावसाला सुरूवात झाली. कासावीस झालेल्या, बळीराजाने आपल्या उपजीवीकेसाठी शेतीच्या कामाला सुरूवात केली.
मजुरीसह मनोरंजनही : रोवणी संपताच होतो ढोलताशांचा गजर
बाराभाटी : दमदार पावसाला सुरूवात झाली. कासावीस झालेल्या, बळीराजाने आपल्या उपजीवीकेसाठी शेतीच्या कामाला सुरूवात केली. शेतीला नांगरून पऱ्हे आले, नंतर पऱ्हे शेतीत रोवण्यास सुरूवात केली. ग्रामीण भागातील महिला आपल्या सुंदर सुरेल गोड आवाजात गाणी म्हणत शेतात रोवी करीत आहेत.
उट उट पाकुरा,
जा माझ्या माहेरा...
केवळ मोठा गुणवान
कोढाबाई राबवित मन...
‘केवळ बोले... ही... केवळ बोले’ बहिणाबाईच्या ओळी महिला हिरहिरीने गातात. उन्हाळा संपताच प्रतिक्षा फक्त पावसाचीच असते. जून-जुलैमध्ये पाऊस आला की आनंदाने काळ्या-काळ्या कसदार शेतामध्ये सुपीकाचे रंग चढवितांना शेतकरी नांगरतो, वखरतो, रोप लावतो. धान्य फोकतो, चिखलाच्या बांधीमध्ये धान रोवतो. महिला मंडळी सुंदर सुरतालामध्ये पावसाची गाणी गात रोवणी करताना दिसतात. शेतमजूरही आपल्या शेतीची कामे जोमाने आनंदाने करतात. पऱ्हे काढण्यासाठी परिसरात हुंडे पध्दती, मजूरी पध्दतीने रोवणी करतात. हुंडे पध्दतीमध्ये मजूरांची १७५, २०० रूपये अशी रोजी दिली जाते. मजूरी १००, १२०, १३० अशा प्रकारची मजूरी दिली जाते. मनोरंजनाचा एका पाठच तयार करून संपूर्ण रोवणी करतांना अनेक कविची, गीतकारांची गीत-गाणी गायली जाण्याची ग्रामीण भागातील परंपराच आहे. ग्रामीण भागातील शेतकरी स्वत:कडे लक्ष घालत शेतमालक रोवणी लवकर करण्याचा तगादा लावत आहेत. रोवणी करणाऱ्या मजूर महिला विश्रांती घेणे, पुन्हा नविन पात पकडून रोवणीला सुरूवात करणे हे एक वेळापत्रकच ठरला जातो.
अनुप्रास यांचा वापर करून रचलेली सुखद, सुरेल गाणी विठ्ठल वाघ, कुसुमाग्रज, केशवसूत, केशवकुमार, बालकवी, बहिणाबाई चौधरी अशा नामवंत कवींची गाणी गाईली जात आहेत.
परिसरात १० दिवसात पावसाच्या आगमनाने ग्रामीण परिसर धान्य रोवणी कामास सुरूवात झाल्यावर बळीराजा सुखावल्याचे चित्र दिसत आहे. पावसाने वेळोवेळी साथ दिली तर क्षणाक्षणाला शेतकरी हसतमुख होतो. रोवणी संपण्याची एक मजा म्हणून चिखल पूजा करणे, चिखल लावणे, शेतामधून ढोल-ताशा, डपळी वाद्याने रोवणीची रॅली मालकाच्या घराकडे आणतात. परंपरेने खांद्यावर नांगर, हातात जुपना, तुतारी फन ही साधने समादित मजूर गाणे गात घराकडे निघतात. रोवणी वेळची रुढी, परंपरा, चालरितीनुसार ही विदर्भ आणि ग्रामीण भाग हा रोवणीच्या वेळी गाण्याच्या तालावर संपूर्ण बहरला दिसतो आहे. महिना-दिड महिना चालणाऱ्या या रोवणीच्या कामांना हसत-खेळत ओटोपण्यासाठी मजूर वर्ग गाण्यांचा आधार घेतात. (वार्ताहर)