भाजीपाला, डाळींसोबत तांदूळही महाग.. सर्वसामान्यांना महागाईचा ताण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 04:31 PM2024-07-04T16:31:18+5:302024-07-04T16:33:15+5:30
बजेट सांभाळताना गृहिणींची होतेय तारांबळ : तांदूळ, डाळींच्या दरात वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जेवणाच्या ताटात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि वरण-भात असेल तरच योग्यरीत्या पोषण होणे शक्य आहे. मात्र, आठवडाभरापासून सर्वच भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले असून, तांदळाचा दरही सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य कुटुंब जेरीस आली आहेत. विशेषतः गृहिणींचे मासिक आर्थिक बजेट बिघडल्याने त्यांची तारांबळ होत आहे.
गोंदिया येथील धान्य विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गतवर्षी चिन्नोर, आंबेमोहोर, बासमती यांसह इतरही प्रजातींच्या तांदळाचे दर पूर्णतः नियंत्रणात होते. त्यानंतर मात्र दरात सातत्याने वाढ होत गेली. गोंदिया शहर तथा तालुक्यातील नागरिकांकडून चिन्नोर, कालीमूंछ आणि आंबेमोहोर या प्रजातींच्या तांदळाची सर्वाधिक मागणी असून, तिन्ही प्रकारचा तांदूळ चांगलाच महागला आहे. काही महिन्यांपूर्वी ५५ ते ६० रुपये प्रतिकिलो असलेले चिन्नोरचे दर सध्या ७२ ते ७५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. आंबेमोहोरच्या दरानेही ७५ रुपये प्रतिकिलोंचा टप्पा ओलांडला असून, बासमती तांदूळ ९० ते ११० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. ही बाब सर्वसामान्यांच्या मासिक खर्चाच्या बजेटवर मोठा परिणाम कोलम करणारी ठरली आहे.
शंभर रुपयांत केवळ तीन भाज्या
गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. प्रत्येकी पावकिलो या प्रमाणात तीन ते चार भाज्या घेण्यासाठी शंभर रुपये मोजावे लागत आहेत. टोमॅटोचे दरसुद्धा ८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.
जुन्या तांदळाला सर्वाधिक मागणी
गोंदिया शहरात जुना चिन्नोर, कोलम आणि आंबेमोहोर तांदळाला सर्वाधिक मागणी आहे. यासह आंबेमोहोर आणि बासमती तांदूळ देखील खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक व्यापाऱ्यांनी सांगितले.
तांदाळाचे प्रकार व सध्याचे दर
बासमती - १२००० रुपये (प्रतिक्विंटल)
जय श्रीराम - ६५०० रुपये
चिन्नोर - ७२००
कोलम - ६५००
आंबेमोहोर - ७६००
गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यात आता तांदूळ व डाळींच्या दरातसुद्धा वाढ झाल्याने महिन्याचे बजेट पूर्णपणे बिघडले असून ते सावरायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- अर्चना ठवरे, गृहिणी
महागाईत सातत्याने वाढ होत आहे. भाजीपाला व धान्याच्या दरात वाढ होत आहे. तर दुसरीकडे विजेच्या दरातही वाढ झाल्याने महिन्याचे बजेट सांभाळताना फारच तारेवरची कसरत होत आहे.
- सुनिता ब्रम्हपुरे, गृहिणी
शहरातील ग्राहक, जय श्रीराम, कोलम, बासमतीसह अन्य ठराविक तांदळाला पसंती देतात. गेल्या काही दिवसांपासून तांदळाच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. सध्या हे दर कमी झाले नसून तांदळाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
- पिंटू अग्रवाल, धान्य विक्रेता.