नांदेड जिल्ह्यातून होतेय जिल्ह्यात तांदळाची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 05:00 AM2022-02-13T05:00:00+5:302022-02-13T05:00:07+5:30
बऱ्याच राइस मिलर्सने भरडाईसाठी तांदळाची उचल केलेली नाही, तर काही राइस मिलर्स भरडाईसाठी धानाची उचल करीत आहे, पण त्याची भरडाई न करता, तो धान परस्पर विक्री करतात. भरपूर लाभार्थी रेशनच्या तांदळाची विक्री करतात. हा तांदूळ घेणारे व्यापारी महाराष्ट्रात सर्वत्र सक्रिय आहेत. हाच तांदूळ ते १२ ते १४ रुपये दराने माेठ्या व्यापाऱ्यांना विक्री करतात. पुढे भरडाईसाठी करार केलेले काही राइस मिलर्स हा तांदूळ खरेदी करून ते केवळ शासनाने दिलेल्या कट्ट्यांमध्ये भरून तो तांदूळ शासनाकडे जमा करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रेशनचा तांदूळ पुन्हा रेशनच्या दुकानात हा प्रकार आता जिल्हावासीयांसाठी नवीन राहिलेला नाही. सहा महिन्यांपूर्वी हे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर, या प्रकाराला काही प्रमाणात पायबंद लागला होता. मात्र, शुक्रवारी यवतमाळ पोलिसांनी नांदेड येथून तांदूळ घेऊन येणारा एक ट्रक पकडला. हा ट्रक गोंदिया येथील तांदूळ विक्रेत्याकडे येणार होता. यात रेशनचा तांदूळ असल्याचे बोलले जाते. ते चौकशीअंती स्पष्ट होईलच. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातून जिल्ह्यात रेशनच्या तांदळाची तस्करी सुरूच असल्याचे चित्र आहे.
गोंदिया जिल्हा तांदूळ उत्पादकांचा जिल्हा आहे, तर जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्रावरून धानाची खरेदी केली जाते. त्यानंतर, या तांदळाची राइस मिलर्ससह करार करून भरडाई करून तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. त्यानंतर, हा तांदूळ भारतीय खाद्य महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानाना पुरवठा केला जातो, पण मागील दोन-तीन वर्षांपासून भरडाईनंतर तांदळाचा पडता येत नसल्याने भरडाईसाठी शासनाशी करार केलेल्या राइस मिलर्सला ते परवडत नाही. ही बाब त्यांनी अनेकदा शासनाच्या निदर्शनासही आणून दिली.
एवढेच नव्हे, तर टेस्टिंग मिलिंगचीही मागणी केली, पण शासनाने ही बाब अद्यापही गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळेच बऱ्याच राइस मिलर्सने भरडाईसाठी तांदळाची उचल केलेली नाही, तर काही राइस मिलर्स भरडाईसाठी धानाची उचल करीत आहे, पण त्याची भरडाई न करता, तो धान परस्पर विक्री करतात. भरपूर लाभार्थी रेशनच्या तांदळाची विक्री करतात. हा तांदूळ घेणारे व्यापारी महाराष्ट्रात सर्वत्र सक्रिय आहेत.
त्यानंतर, हाच तांदूळ ते १२ ते १४ रुपये दराने माेठ्या व्यापाऱ्यांना विक्री करतात. पुढे भरडाईसाठी करार केलेले काही राइस मिलर्स हा तांदूळ खरेदी करून ते केवळ शासनाने दिलेल्या कट्ट्यांमध्ये भरून तो तांदूळ शासनाकडे जमा करतात. त्यामुळेच रेशनचा तांदूळ पुन्हा रेशनच्या दुकानात अशी प्रक्रिया चालत असल्याची माहिती आहे.
रेशनच्या तांदळाची विक्री करणे गुन्हा
- रेशनकार्डधारकांना महिन्याकाठी दिला जाणारा रेशनचा तांदूळ हा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दिला जातो; पण बरेच लाभार्थी गरजेपुरता तांदूळ ठेवून उर्वरित तांदळाची विक्री करतात. तांदळाची विक्री करणे हा गुन्हा, तसेच या लाभार्थ्यांकडून हा तांदूळ घेणाऱ्यांनासुद्धा तेवढेच दोषी मानले जाते. मात्र, यानंतरही रेशनच्या तांदळाचा गोरखधंदा सुरूच आहे.
आंध्र प्रदेशात चालला तांदूळ
- आंध्र प्रदेशात रेशनच्या तांदळाला चांगला भाव मिळत असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले. मात्र, तांदूळ पाठविताना आठ ते दहा नाक्यांवर पैसे मोजावे लागतात, तर थोडी जोखीमही आहे. त्यामुळे या तांदळाची वाहतूक ही रात्री १२ वाजेनंतरच केली जात आहे. यासाठी मोठी सेटिंग करावी लागत असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले.
नियंत्रण कुणाचे
रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक करताना आतापर्यंत अनेकदा कारवाई करण्यात आली. पंधरा दिवसांपूर्वीच नागपूर येथील एका मोठ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, यानंतरही या प्रकाराला अद्यापही चाप बसलेला नाही. रेशनच्या तांदळाची विक्री सर्रासपणे सुरूच असून, नांदेडसह इतर जिल्ह्यांतून तांदूळ येत असून, यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याची माहिती आहे.
बड्या आसामींचा समावेश
- रेशनचा तांदूळ खरेदी करणे व तो सुरक्षित स्थळी पाठविणे हे मोठे जोखमीचे काम आहे. हे काम एकट्यादुकट्याचे नसून यात काही बड्या आसामींचा समावेश आहे. त्यामुळे ते हा तांदूळ नाक्यावरून सुरक्षितपणे बाहेर पाडण्याची मुख्य भूमिका पार पाडत असल्याची माहिती आहे.