गोंदियात लवकरच राईस पार्क; देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:35 AM2018-02-17T11:35:01+5:302018-02-17T11:36:31+5:30

गोंदिया-भंडारा जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत होईल यादृष्टीने लवकरच राईस पार्कला मान्यता देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित कार्यक्रमात केली.

Rice Park in Gondia soon; Devendra Fadnavis | गोंदियात लवकरच राईस पार्क; देवेंद्र फडणवीस

गोंदियात लवकरच राईस पार्क; देवेंद्र फडणवीस

Next
ठळक मुद्देवर्ग २ च्या जमिन वर्ग करण्यासाठी अर्जाची गरज नाही

संतोष बुकावन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यात राईस क्लस्टरला मान्यता मिळाल्याने आता गोंदिया जिल्ह्यात संशोधनात्मक काम होऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत होईल आणि यादृष्टीने लवकरच राईस पार्कला मान्यता देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित कार्यक्रमात केली. अर्जुनी मोरगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर भूमि स्वामी ऐवजी भूमिधारी अशा नोंदी आहेत. वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यासाठी यापुढे कुठल्याही शेतकऱ्याला अर्ज करावा लागणार नाही.असा निर्णय शासनाने घेतला असून जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांवर रोजच एक संकट येते, कधी गारपिटीचे तर कधी दुष्काळाचा सामना करावा लागतो. यात मोठे नुकसान होते. ही परिस्थिती केवळ वातावरणाच्या बदलामुळे उद्भवते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे... हे आम्हाला संतानी सांगितले होते. वृक्ष, जलस्त्रोत व तलावांचे नुकसान केले तर निसर्ग हा कोपणारच. गोंदिया जिल्ह्यात रोवणी झाली नाहीत. जिथे धानाची लागवड व रोवणी झाली तिथे तुडतुड्याने ग्रासले. नुकतीच गारपीट झाली. प्रत्येक शेतकऱ्याला शासनाने मदत देण्याचे ठरविले तरी देखील शेतकरी समृध्द होऊ शकत नाही. त्यांना समृध्द करायचे असेल तर शेती शाश्वत करावी लागेल. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. गोंदिया जिल्ह्यात जवळ-जवळ ४२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. ७० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहचत आहेत. शेतीत शाश्वतत्ता नसल्यामुळेच आमच्यावर कर्जमाफीची वेळ येते. निसर्गाची साधर्म्य राखाल तर आमचेवर ही वेळ येणार नाही. जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख आहे. अनेक संकट येतात तरी येथील एकही शेतकरी आत्महत्या करत नाही. तो संकटाचा सामना करतो ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. अशा शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे काम राज्य शासनाच्या वतीने करीत असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांसाठी मजुरांनी दिले १ लाख रुपये
दुष्काळामुळे जिल्ह्यात एक लाख मजूर रोहयोच्या कामावर आहेत. पण येथील मजूरांची श्रीमंती बघा, त्यांनी मजुरीतून प्रत्येकी एक रुपया शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचे पत्र मला दिले. खरोखरच ही गौरवाची बाब असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मजुरांचे कौतुक केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा गौरव
महाराष्ट्रात अमूल्य कार्य केल्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला. तो पुरस्कार तुकडोजी महाराजांचे सचिव जनार्धन बोथे यांनी स्वीकारला.वारकरी संप्रदायच्या विशेष सेवेसाठी संत गाडगे महाराज मिशन नागरवाडी (जि.अमरावती) यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्रात व राज्याबाहेर वारकरी संप्रदायचा प्रसार व प्रचाराचे कार्य करणारे हभप बाबा महाराज राशनकर पंढरपूर यांना प्रदान करण्यात आला. तर राज्यात संप्रदायाचा प्रसार व प्रचाराचे विशेष कार्य केल्याबद्दल भक्त पुंडलिक फडचे प्रमुख हभप माधव महाराज शिवणीकर यांना गाडी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले.

Web Title: Rice Park in Gondia soon; Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.