३० एकरातील धानपिक संकटात
By Admin | Published: April 23, 2016 01:43 AM2016-04-23T01:43:13+5:302016-04-23T01:44:36+5:30
तालुक्यातील सर्वात मोठ्या तलावापैकी एक पानगावचा तलाव यंदा एप्रिल महिन्यातच कोरडा पडला.
पानगावच्या तलावात ठणठणाट : संपूर्ण पाणी आटल्याने उन्हाळी पिकांना फटका
सालेकसा : तालुक्यातील सर्वात मोठ्या तलावापैकी एक पानगावचा तलाव यंदा एप्रिल महिन्यातच कोरडा पडला. या तलावाच्या पाण्याच्या भरवसावर लावलेले ३० एकरांतील धानपिक संकटात आले आहे. तलाव आटल्याने गौरीटोला पानगावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
जवळपास १०० एकरांत पावसाच्या खरीप पिकासाठी वेळोवेळी वरदान ठरणारा तसेच ६० एकर क्षेत्रात उन्हाळी पिकासाठी पाण्याची पूर्तता करणारा पानगाव येथील मोठा तलावात यंदा पूर्ण ठणठणाट झाल्याने एप्रिल महिन्यातच लक्षात आले. या तलावाच्या पाण्याने दरवर्षी ४०-५० एकरातील पीक काढण्यासाठी येथील पाणी शेवटपर्यंत पुरते. तसेच कपडे धुणे, जनावरे धुणे, गाई, म्हशी, बैलांना पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना वाहनाना विविध कामासाठी या तलावाच्या पाणी वापरता येते. दरवर्षी या तलावात पाणी राहात होते. वर्षभर विविध कामासाठी पाण्याचा उपयोग करून ही या तलावात जलसाठा पावसाळा लागेपर्यंत राहात होता. परंतु यंदा या तलावाची अशी दुर्दशा बघून सगळेच अवाक झाले आहेत. हा तलाव राज्यमार्ग २४९ आमगाव-सालेकसा-डोंगरगड मार्गावर रस्त्यालगत आहे. या तलावात पाणी साठा याचा जवळून प्रवास करणे आनंददायी वाटत असते. परंतु या अनेक वर्षानंतर या तलावाचे सौंदर्य व वैभव नष्ट झाले आहे. यंदा तलावाच्या जवळून प्रवास करताना नैराश्य पूर्ण अनुभव येत आहे. या तलावातून निघणारा कालवा हा संपूर्ण पानगाव परिसराला गौरी आणि बच्चनटोला परिसराला पाणी पुरवठा होत असून वर्षभर या कालव्याचे पाणी विविध उपयोगासाठी वापरणे महिलांना सोयीस्कर ठरत होते. परंतु आता पाण्याअभावीे मोठा त्रास होत आहे. सर्वात मोठे संकट म्हणजे या तलावाच्या भरवश्यावर लावलेले धानपीक संकटात सापडले आहे. धान पिकाला गळा दाबण्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. येथील जलसाठा अल्प असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी धानपीक घ्यायचे नव्हते. परंतु शेतकऱ्यांनी परिस्थिती न समजून घेता चूक केली याचा फटका त्यांना बसत आहे.(तालुका प्रतिनिधी)