तालुक्यात ४८ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:06 PM2017-10-15T22:06:36+5:302017-10-15T22:06:48+5:30
तालुक्यात ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या ३२ ग्रामपंचायतींपैकी ३१ ग्रामपंचायतीसाठी सरपंच आणि सदस्य निवडून देण्यासाठी एकूण ४८ हजार ८९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यात ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या ३२ ग्रामपंचायतींपैकी ३१ ग्रामपंचायतीसाठी सरपंच आणि सदस्य निवडून देण्यासाठी एकूण ४८ हजार ८९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सोमवार (दि.१६) आॅक्टोबरला सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान चालणार असून ३१ ग्रामपंचायतीत एकूण ९७ मतदान केंद्र स्थापित करण्यात आले आहेत. ज्या ३१ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे त्यात लोहारा, कोसमतर्रा, बिजेपार, पांढरवाणी, बोदलबोडी, भजेपार, मक्काटोला, गांधीटोला, कडोतीटोला, पिपरीया, दरेकसा, टोयागोंदी, जमाकुडो, निंबा, तिरखेडी, खोलगड, गिरोला, नानव्हा, रोंढा, गोर्रे, झालीया, धानोली, दरबडा, बिंझली, कहाली, लटोरी, नवेगाव, पाथरी, बाम्हणी, खेडेपार आणि सोनपुरी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
तालुक्याचे निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या मार्गदर्शनात आणि प्रत्यक्ष देखरेखीत संपूर्ण निवडणूक यंत्रणा कामाला लागली असून शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे. यासाठी ९७ मतदान केंद्रावर एकूण ४२८ कर्मचारी कामावर लावण्यात आले आहे. यात ९७ केंद्राध्यक्ष आणि २९१ मतदान अधिकारी असून काही कर्मचाºयांची राखीव नियुक्ती करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त तालुका प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग देत आहेत. यात बीडीओ अशोक खाडे, वन परिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान, वाय.सी. भोयर, तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले यांच्यासह सर्व कार्यालयातील अधिकाºयांचा समावेश आहे.
३० सरपंच पदासाठी १०३ उमेदवार
३२ ग्रामपंचायतींपैकी १७ ग्रामपंचायत महिलांसाठी राखीव असून यात आमगाव खुर्दमध्येही महिला राखीव होती. परंतु या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. तसेच खेडेपार ग्रामपंचायतीवर महिला सरपंच बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता ३० सरपंच पदासाठी १५ महिला आणि १५ पुरुष सरपंच बनण्यासाठी एकूण १०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यासाठी २४ हजार २४५ पुरुष आणि २३ हजार ८४४ महिला, असे एकूण ४८ हजार ८९ मतदार मतदान करतील.
अनेक दिग्गज उतरले मैदानात
तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषदपासून आमदार, खासदारसुद्धा आरक्षित पदे असल्याने आता तालुक्यातील दिग्गज नेत्यांचे सरपंच निवडणुकीकडे लक्ष आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतीत खुल्या प्रवर्गाचे सरपंच पद अनारक्षित आहे त्या ठिकाणी तालुका ते जिल्हा पातळीवरील पक्ष पदाधिकारी आपले नसीब आजमावत आहेत. यात कोणी सरपंच तर कोणी सदस्य म्हणून उमेदवार आहेत. यात भाजपचे तालुकाध्यक्ष परसराम फुंडे गिरोला येथे, राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण नागपुरे बाम्हणी येथे, भाजपचे जिल्हा सचिव संजू कटरे तिरखेडीतून, काँग्रेसचे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष देवचंद ढेकवार बिंझली येथे सरपंच बनण्यासाठी थेट मैदानात उतरले आहेत. त्याच बरोबर अनेक दिग्गजांनी आपल्या पत्नी मैदानात उतरवून निवडणुकीची धुरा सांभाळी आहे.
नक्षलग्रस्त भागात कडेकोट बंदोबस्त
तालुक्यातील दरेकसा, पिपरीया आणि बिजेपार परिसर नक्षल प्रभावित भागात आहे. या भागातील १६ मतदान केंद्र संवेदनशील आणि ११ मतदान केंद्र अतिसंवेदनशील ठरविण्ययात आले आहेत. या मतदान केंद्रावर सुरक्षा विभागाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल. प्रत्येक केंद्रावर पोलीस कमांडो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. तसेच दरेकसा, पिपरीया आणि बिजेपार या तिन्ही ठिकाणी सशस्त्र दुरस्थ क्षेत्र (एओपी) असून या भागातील सर्व मतदान अधिकारी त्यांच्या सुरक्षेत राहतील आणि त्यांना मतदान केंद्रावर नेण्यात येईल.