रिनायत कुटुंबीय जगताहेत दोन महिन्यांपासून बहिष्कृत जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:27 AM2021-02-13T04:27:53+5:302021-02-13T04:27:53+5:30
गोंदिया: गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या धामणेवाडा येथील साहेबराव भाऊजी रिनायत यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मागील दोन महिन्यापासून बहिष्कृत जीवन ...
गोंदिया: गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या धामणेवाडा येथील साहेबराव भाऊजी रिनायत यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मागील दोन महिन्यापासून बहिष्कृत जीवन जगावे लागत आहे. कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला बोलवायचे नाही असा निर्णय काही समाजबांधवांनी २७ नोव्हेंबर २०२० ला घेतलेल्या बैठकीत घेतला.
२८ नोव्हेंबरला गजानन इतराज हरिणखेडे यांच्या घरी तेरवीचे कार्यक्रम होते. त्यावेळी साहेबराव रिनायत यांना बोलावण्यात आले होते. परंतु समाजातील काही लोकांनी साहेबराव रिनायत यांना तुम्ही घरी जेवायला बोलावले तर आम्ही येणार नाही अशी धमकी दिल्यामुळे गजानन हरिणखेडे यांनी साहेबराव यांना फोन करून सांगितले की तुम्ही आमच्या घरी जेवण करायला येऊ नका अन्यथा आमच्या घरी कुठल्याही समाजाचा माणूस येणार नाही असे म्हटले. २८ जानेवारी रोजी ज्ञानेश्वर कटरे यांच्या घरी तेरवी कार्यक्रम असताना त्यावेळच्या कार्यक्रमातही साहेबराव रिनायत यांना बोलावू नका अन्यथा मी तुमच्या घरी येणार नाही अशी धमकी काही समाजबांधवांनी दिल्यामुळे कटरे कुटुंबानीही साहेबराव रिनायत यांना व त्यांच्या कुटुंबीयांना बोलावले नाही. यासंदर्भात वारंवार गंगाझरी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही ठाणेदार टिळेकर यांनी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रिनायत यांनी केला आहे. साहेबराव रिनायत यांच्यावर बहिष्कृत जीवन जगण्याची पाळी आणणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचा सख्खा भाऊ गिरधारी रिनायत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एकीकडे लोक प्रगतीच्या वाटेवर असतांना दुसरीकडे आजही ग्रामीण भागात एखाद्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येतो आणि याची तक्रार पोलिसात गेल्यावरही पोलिसांनी कसलीही कारवाई न करणे ही बाब लोकशाहीला लाजिरवाणी आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी साहेबराव रिनायत यांनी केली आहे.