तरूणाला मारहाण करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल
By admin | Published: October 5, 2015 02:03 AM2015-10-05T02:03:19+5:302015-10-05T02:03:19+5:30
रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत टीबीटोली येथे शुक्रवारी रात्री १० वाजता दरम्यान घरात शिरून तरूणाला मारहाण करण्यात आली.
गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत टीबीटोली येथे शुक्रवारी रात्री १० वाजता दरम्यान घरात शिरून तरूणाला मारहाण करण्यात आली. प्रकरणात तरूणाला मारहाण करणाऱ्या सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा येथील गजानन ऊर्फ जय आत्माराम ठेंगे (२७) हा तरूण गोंदियातील टिबीटोली निवासी बालू बोपचे यांच्या घरी भाड्याने राहून चप्पल विक्रीचे काम करतो.
चप्पल विक्रीचे हे काम करण्यासाठी तो बेरोजगार मुलामुलींना चप्पल विकण्याचा रोजगार उपलब्ध करून देतो. परंतु ज्या बेरोजगार मुला-मुलींना चप्पल विक्रीसाठी दिल्या ते सामान घेऊन पळून जाऊ नयेत म्हणून त्या बेरोजगारांकडून गजानन ५०० रूपये अनामत म्हणून आपल्याकडे जमा करून ठेवत होता.
परंतु ते ५०० रूपये चुकीच्या पध्दतीने घेत असल्याचा आरोप करीत महेंद्र माने (४५) रा. गोंदिया, दीनदयाल ठाकरे (३२) रा. गड्डाटोली गोंदिया, देवानंद कोरे (२५) रा. आमगाव, भांडारकर व इतर दोन अशा सहा जणांनी त्याला बेदम मारहाण केली.
शुक्रवारी रात्री १० वाजतादरम्यान घडलेल्या या प्रकरणात रामनगर पोलिसांनी आरोपींविरूध्द भादंविच्या कलम ४५२, ३२४, २३२, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)