मनिष भालाधरेच्या मारेकऱ्यांवरील गुन्ह्यात वाढ; लावले ॲट्रॉसिटीचे कलम
By नरेश रहिले | Published: January 8, 2024 07:31 PM2024-01-08T19:31:42+5:302024-01-08T19:32:41+5:30
आरोपींना १२ जानेवारीपर्यंत पीसीआर: गोंदियाच्या डीवायएसपीकडे तपास.
गोंदिया : जुन्या उधारीच्या पैशांना घेऊन झालेल्या वादात तिघा बापलेकासह अन्य दोघांनी मिळून मनीष ऊर्फ ईश्वर भालाधरे (३०,रा. आंबेडकर चौक, कुडवा) या तरुणाला कुडवा येथील इंजिनिअरिंग कॉलेजजवळ शनिवारी (दि.६) रात्री ८ वाजता ठार केले. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने १२ जानेवारीपर्यंत पाेलीस कोठडी सुनावली आहे. सोबत त्या आरोपींवर ॲट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण ऊर्फ लक्की राजकुमार मेश्राम (रा. आंबेडकर चौक, वॉर्ड क्रमांक-३, कुडवा), मनीष भालाधरे आणि राहुल बरेले हे तिघे शनिवारी (दि.६) रात्री ८ वाजता दरम्यान इंजिनिअरिंग कॉलेज समोर सिगारेट पिण्याकरिता संतोष रामेश्वर मानकर यांच्या लकी रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तेथे त्यांचा मित्र प्रवेश मेश्राम याच्या जुन्या उधारीच्या पैशावरून वाद झाला. या वादात मिरची पावडर मनीष भालाधरे यांच्या डोळ्यात फेकून संतोष मानकर, लकी ऊर्फ लोकेश संतोष मानकर, पवन संतोष मानकर, जॉर्डन ऊर्फ मोहित शेंडे आणि विधीसंघर्ष ग्रस्त बालक (सर्व रा. कुडवा) यांनी लोखंडी रॉड, कुऱ्हाड, कोयता इत्यादी घातक हत्यारांनी वार करून मनीष भालाधरे याला ठार केले. रामनगर पोलिसांनी आरोपींवर भादंवि कलम ३०२, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. पुन्हा अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३ (२) (५), ३ (२), (व्ही.ए.) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे करीत आहेत.