तलावातील अतिक्र मणांमुळे विषबाधेचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:24 AM2019-09-04T00:24:16+5:302019-09-04T00:25:38+5:30
तालुक्यात इटियाडोह व नवेगावबांध हे दोन मोठे तलाव आहेत. या तलावांच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. एकट्या नवेगावबांध तलावकाठावर सुमारे २०० एकर शेतजमीन काढली आहे. या जमिनीत धानपीक घेतले जाते. अधिकच्या उत्पादनासाठी धानपीकांवर सातत्याने रासायनिक खतांचा वापर व किटनाशक औषधांचा मारा केला जातो.
संतोष बुकावन।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : नवेगावबांध तलावाच्या बुडीत क्षेत्रात अतिक्र मण वाढले आहे. शेती काढून लोक मोठ्या प्रमाणात धानपीक घेत आहेत. रासायनिक खत व किटकनाशकांच्या होणाऱ्या फवारणीमुळे पाणी दूषित होते. याच पाण्याचा पुरवठा लोकांना होतो. या प्रकारामुळे तलावातील जैवविविधता, वन्यप्राणी व मानवी जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासन मात्र धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहे.
तालुक्यात इटियाडोह व नवेगावबांध हे दोन मोठे तलाव आहेत. या तलावांच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. एकट्या नवेगावबांध तलावकाठावर सुमारे २०० एकर शेतजमीन काढली आहे. या जमिनीत धानपीक घेतले जाते. अधिकच्या उत्पादनासाठी धानपीकांवर सातत्याने रासायनिक खतांचा वापर व किटनाशक औषधांचा मारा केला जातो. याची सरमिसळ तलावातील पाण्यात होते. तालुक्यातील २९ गावांच्या सात हजार लोकांना नवेगावबांध तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.
तलावात अमाप पाणी असल्याने याचा प्रभाव जाणवत नाही. मात्र शेवटी आपण विषाचा घोट प्राशन करतो हे नाकारता पण येत नाही. एकट्या नवेगावबांध तलावातील अतिक्रमीत २०० एकर शेतीतून पाच हजार किग्रॅ थायमेट हे विषारी औषध दरवर्षी पाण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती जाणकारांनी दिली आहे. नेमके हेच चित्र इटियाडोह धरण बुडीत क्षेत्रातही बघावयास मिळते. या धरणातून सुमारे १६ गावातील १० हजार लोकांना पाणीपुरवठा होतो.
विशेष म्हणजे, कर्मचारी मुकदर्शक बनले असून हल्ली पगारापूरती नोकरी झाली आहे. शहरी भागात राहण्याची ओढ व सोयीसुविधांच्या मोहापोटी कर्मचाऱ्यांनी आपले जीवन धकाधकीचे करून ठेवले आहे.
खूप कमी कर्मचारी मुख्यालयात राहतात. परिणामी त्यांचे कर्तव्याच्या ठिकाणी दुर्लक्ष होते. याचाच गैरफायदा घेत लोकांनी अतिक्र मणाचा सपाटा लावला आहे. ज्या गावात नोकरी करतो तेथील लोकांचा विरोध नको म्हणून अतिक्र मणधारकांवर कारवाई होताना दिसत नाही. शेवटी अतिक्र मण नियमित करण्यासाठी शासनाला कायदा करावा लागतो हे वास्तव आहे. अशा कामचुकार कर्मचाºयांवर मात्र कारवाई होत नाही हे खरे दुर्दैव आहे.
सारस ठरले विषाचे बळी
सारस पक्ष्यांची संख्या जिल्ह्यात अत्यल्प आहे. अशीच सारसाची एक जोडी तालुक्यातील बोंडगाव-सुरबन येथील शृंगारबांध तलावात होती. पाच वर्षांपूर्वी तलावाशेजारी असलेल्या अतिक्रमित शेतजमीनीतील किटनाशक औषधयुक्त पाणी प्यायल्याने या जोडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ही एकमेव सारस जोडी अशा निष्प्रभ प्रशासनाची बळी ठरली. हल्ली प्रशासन अलर्ट झाले असून सारस बचावची मोहीम राबविली जात आहे. मात्र जे होते त्याचा बचाव करण्यात सपशेल अपयशी ठरले.
विदेशी पक्ष्यांनाही धोका
हिवाळ््यात सातासमुद्रापार प्रवास करीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात सायबेरीयन पक्षी नवेगावबांध तलावावर येतात. आपले भक्ष्य शोधण्याच्या प्रयत्नात ते अशा शेतात जाऊन विषयुक्त पाणी प्राशन करून मृत्युमुखी पडत असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र याची माहिती केवळ त्या शेतकºयालाच होते. इतरत्र वाच्यता होत नसल्याने हा प्रकारचं उजेडात येत नाही असा सूर पक्षीप्रेमींमध्ये व्यक्त केला जात आहे.
तलावांचे क्षेत्रच कमी झाले
अर्जुनी-मोरगाव तालुक्याची तलावांचा तालुका अशी ओळख आहे. तालुक्यात तब्बल ३३३ तलाव आहेत. मात्र प्रत्येक तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. विविध शासकीय विभागांच्या अखत्यारीत हे तलाव असले तरी त्या यंत्रणांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तलावांचे क्षेत्रफळच कमी झाले आहे. तलावांच्या बुडीत क्षेत्रात आता शेती होऊ लागली आहे. त्यामुळे पाणी साठवणूक क्षमता कमी झाली आहे. याचा अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांनाच फटका आहे. शिवाय अतिक्रमणाच्या वादावरून भांडणं वाढली आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या अतिक्र मणांमुळे गावागावात समस्या सुद्धा वाढणार आहेत. प्रशासनाने तलावांच्या क्षेत्राची मोजणी करून असे अतिक्र मण काढून घेणे काळाची गरज आहे.
वन्यप्राणीही संकटात
नवेगावबांध तलावाशेजारूनच व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. याठिकाणी वन्यजीव पाणी पिण्यासाठी येतात. विषारी व दूषित पाण्यामुळे त्यांचेवर विषबाधेचे संकट ओढवले आहे. असे प्रकार घडत असावेत मात्र ते उजेडात येत नसल्याने प्रशासनाला यातील गांभिर्य कळत नाही. वन्यजीव विभाग ‘आॅल ईज वेल’ असल्याचे भासविते. मात्र अतिक्र मण हटविण्याचे धाडस कुणीतरी दाखिवल्याचे ऐकिवात नाही. असाच प्रकार इटियाडोह व तालुक्यातील इतर तलावांतील बुडीत क्षेत्रात काढलेल्या अतिक्र मणाच्या शेतजमिनीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.