बँक व डाक विभागाची विश्वसनीयता धोक्यात
By admin | Published: March 11, 2017 12:19 AM2017-03-11T00:19:45+5:302017-03-11T00:19:45+5:30
डाक विभागाच्या स्पीड पोस्ट सेवेद्वारे पाठविलेल्या दोन चेकबुकमधून प्रत्येकी एकेक चेक कमी मिळाला.
पोलीस तपास सुरू : चेक दडपणाऱ्यांनी केला ८० हजारांचा विड्रॉल
काचेवानी : डाक विभागाच्या स्पीड पोस्ट सेवेद्वारे पाठविलेल्या दोन चेकबुकमधून प्रत्येकी एकेक चेक कमी मिळाला. कमी मिळालेल्या दोन्ही चेकद्वारे खातेदारांच्या खात्यातून ८० हजार रूपयांची उचल करण्यात आल्याची बाब उघड झाली. एवढेच नव्हे तर तो संशयित इसम कोण? याची माहिती मिळाली असली तरी पोलीस तपासात ते स्पष्ट होणार आहे.
तिरोडा तालुक्याच्या बेरडीपार (काचेवानी) येथील नकटू भिवा कटरे यांचे भारतीय स्टेट बँक शाखा तिरोडा येथे चालू खाते आहे. ते लहान व्यावसायिक असल्यामुळे चेकची मागणी केली होती. ते बँकेच्या मुख्य कार्यालय मुंबईवरून स्पीड पोस्टने बेरडीपार येथील डाक कार्यालयात पाठविण्यात आले. कटरे यांना पहिली चेकबुक ५ जानेवारीला व दुसरी चेकबुक ४ फेब्रुवारीला देण्यात आली. चेकबुकची तपासणी केल्यावर त्या फुटलेल्या अवस्थेत होत्या. तसेच पहिल्या चेकबुकमधून चेक क्रमांक (७७८१२४) व दुसऱ्या चेकबुकमधून क्रमांक (९४५९६८) गायब होते.
याबाबत खातेदार नकटू कटरे यांनी शाखा डाकपाल बिरणवार यांना विचारणा केली. यावर त्यांनी वरूनच अर्धवट पॅक केल्याने त्याची अवस्था जीर्ण किंवा सिल नाहिसी होते, असे उत्तर दिले. तसेच प्रत्येकी एक चेक कमी असल्याबद्दल बँकेनेच कमी पाठविले असावे, असे बिरणवार बोलले.
खातेधारक कटरे यांनी आपल्या स्वाक्षरीशिवाय कुणीही रक्कम काढू शकत नाही, असे समजून बँक व्यवस्थापकाकडे तक्रार केली नसल्याचे सांगितले. मात्र चेकद्वारे ८० हजार रूपये अवैधरित्या त्यांच्या खात्यातून काढण्यात आल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले. त्यांनी एसबीआय तिरोडा शाखेचे व्यवस्थापक दीपक नंदेश्वर व उपव्यवस्थापक विलास रिनायत यांना भेटून माहिती काढली. व्यवस्थापकांनी खातेदाराची सर्वतोपरी मदत करून माहिती काढली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले. यात दुसऱ्या चेकद्वारे ७ मार्च २०१७ रोजी दुपारी ३.०४ वाजता ४० हजार रूपये विड्राल करण्यात आल्याचे समजले.
विड्राल करण्यात आलेल्या चेकवर डुप्लीकेट स्वाक्षऱ्या होत्या. पडताळणी न करता त्याला विड्राल कसा देण्यात आला? ही आश्चर्याची बाब आहे. कटरे यांनी सांगितले की, आपण १० ते २५ हजार रूपये काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दोन ते तीन वेळा स्वाक्षरी मागून शहानिशा केली जात होती. मग हे विड्राल देताना शहानिशा कशी करण्यात आली नाही. यावर कॅशीयर भैसारे यांनी गर्दी असल्याचे सांगतात. मात्र फुटेजमध्ये भीड दिसून येत नाही.
पहिला चेक २३ फेब्रुवारीला ४० हजार रूपयांचा आयसीआयसीआय बँकेत जमा करून कलेक्शनकरिता कामाख्या पांडा गॅमन इंडिया काचेवानी यांच्या नावे असलेल्या खात्यामार्फत पाठविण्यात आल्याचे उघड झाले. कामाख्या पांडा ही लेडी असून चार वर्षांपूर्वी अदानी पॉवरच्या कामातून निघून गेली आहे. हे खाते मागील अनेक वर्षांपासून बंद पडून असल्याने ४० हजाराच्या रकमेतून पाच हजार रूपये बँक चार्ज कपात झाला. २४ फेब्रुवारीला २५ हजार रूपये व ३ मार्चला १० हजार रूपये काढण्यात आल्याची माहिती तिरोडा येथील आयसीआयसीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक विलास रिनायत यांनी दिली.
या फसवणूक प्रकरणाची तक्रार ९ मार्चला तिरोडा पोलीस ठाण्यात देण्यात आली असून तपास सुरू आहे. (वार्ताहर)
चेक दडपणारा व विड्रॉल करणारा कोण?
बेरडीपारचे डाकपाल बिरणवार यांनी फुटलेले पॉकेट दिले होते. दोन बुकमध्ये प्रत्येकी एकेक चेक कमी होते. मुंबई मुख्यालयातून चेक आलेच नाही तर याच क्रमांकाच्या चेकवर विड्रॉल झालेच कसे? बँक अधिकाऱ्यांनी डुप्लीकेट स्वाक्षरीवर विड्रॉल दिले कसे? याच कोणाचे साटेलोटे तर नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच दोन्ही चेकवर एकाच व्यक्तीचे अक्षर असून काळ्या शाईचा वापर करण्यात आला आहे. ७ मार्चच्या फुटेजवर बँकेत बेरडीपारचे डाकपाल झळकत असल्याचे खातेदार कटरे व बँक व्यवस्थापक सांगतात. पोलीस तपासात वास्तव समोर येईलच, पण डाक विभागाची विश्वसनीयतासुद्धा धोक्यात येण्याच्या मार्गावर आहे.
पन्नास हजाराच्या वरील रकमेसंबंधित धनादेश किंवा विड्रालवर बारकाईने लक्ष दिले जाते. त्यापेक्षा कमी रकमेवर विश्वास ठेवून दिला जातो. यात बँकेची चूक नसून सहकार्य करीत आहोत.
-दीपक नंदेश्वर,
शाखा व्यवस्थापक, एसबीआय तिरोडा.
काचेवानीच्या डाक विभागात बिरणवार ७ मार्च २०१६ पूर्वी आपल्या अधिनस्त होते. या तारखेपासून ते बेरडीपारचे शाखा डाकपाल आहेत. यापूर्वी असे घडले नाही.
-विजय असाटी,
शाखा डाकपाल, काचेवानी.