मार्गदर्शनातून प्रतिभावंत घडवा
By Admin | Published: May 23, 2016 01:50 AM2016-05-23T01:50:32+5:302016-05-23T01:50:32+5:30
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिभावंत युवक-युवती आहेत. देशात रोजगाराच्या अनेक संधी असतानासुध्दा ग्रामीण भागातील युवक तेथपर्यंत पोहोचत नाहीत.
पालकमंत्री बडोले : केबीन क्रू व एअर होस्टेस मुलाखतपूर्व तयारी प्रशिक्षण
गोंदिया : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिभावंत युवक-युवती आहेत. देशात रोजगाराच्या अनेक संधी असतानासुध्दा ग्रामीण भागातील युवक तेथपर्यंत पोहोचत नाहीत. अनेक क्षेत्रात आकर्षक रोजगार प्राप्त करणारे हे महानगरातील असतात. योग्य मार्गदर्शन व माहितीअभावी आपल्या येथील प्रतिभावंत तरूणाई मागे पडली आहे. याकरिता जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी मिळवून देण्याकरिता मार्गदर्शन कार्यशाळांची गरज आहे. यातूनच जिल्ह्यातील अनेक प्रतिभावान देशात यशोशिखरावर पोहोचतील, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
ते शनिवार (दि.२१) भाजपा व ना. राजकुमार बडोले मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय एअर होस्टेस व केबीन क्रू मुलाखतपूर्व तयारी प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
कार्यशाळेला भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आ. संजय पुराम, माजी आ. हरीश मोरे, भेरसिंग नागपुरे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, दलित आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील बन्सोड, प्रशिक्षक हेमंत सुटे, केबीन क्रू इंचार्ज प्राची दुनबले गरूड, सिनिअर केबीन क्रू शहराध्यक्ष सुनिल केलनका, ग्रामीण मंडल अध्यक्ष छत्रपाल तुरकर, तिरोडा अध्यक्ष भाऊराव कठाणे, आमगाव अध्यक्ष येसूलाल उपराडे, सडक-अर्जुनी अध्यक्ष विजय बिसेन, जिल्हा सचिव प्रदिपसिंग ठाकूर आदि उपस्थित होते.
पुढे ना. बडोले म्हणाले, एअर होस्टेस, पायलट, केबीन क्रू अशा विमान वाहतूक सेवेतील पदांचे युवकांना मोठे आकर्षण आहे. बार्टीच्या माध्यमातून असे प्रशिक्षण घेतले जात आहेत. यातून अनुसूचित जाती व जमातींच्या उमेदवारांनाच संधी मिळते. मात्र जिल्ह्यातील या क्षेत्रात जाणाऱ्या इच्छुक सर्व प्रवर्गातील युवक-युवतींना प्रशिक्षण मिळवून देण्याकरिता हा फार चांगला उपक्रम आहे. सध्या एअर इंडियात जागा निघाल्या असून त्याला लागणारे सर्व मापदंड काय आहेत, अर्ज कसा करावा, मुलाखतीला कसे सामोरे जावे या सर्व बाबतीत माहिती मिळाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास उंचावण्याचे कार्य या प्रशिक्षणाच्या माध्यमातून होणार आहे. बार्टीच्या माध्यमातून झालेल्या प्रशिक्षणानंतर ७० टक्के उमेदवारांना यश मिळाले. या प्रशिक्षणातून जिल्ह्याचे अनेक युवक-युवती यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करून भविष्यात जिल्ह्यातील युवकांकरिता मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्याकरिता प्रयत्न करीत असल्याचेही सांगितले. यावेळी बडोले यांनी तथागत भगवान बुध्द पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी आ. पुराम यांनी विमानाच्या बाबतीत ग्रामीण भागातील सामान्य लोकांचे स्वप्न काय असतात, याचे अनुभव कथन केले. मात्र आता जिल्ह्यातील तरुणांंना आपले स्वप्न साकार करण्याची संधी ना. बडोले यांनी प्राप्त करून दिली आहे. याचा योग्य लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाध्यक्ष पटले यांनी, ही कार्यशाळा सुरूवात असून भाजपा सरकार युवकांच्या रोजगाराकरिता अनेक संधी निर्माण करीत आहे. देश फार वेगाने पुढे जात आहे. यामुळे आपल्या जिल्ह्यातील युवकांनीसुध्दा कुठल्याही क्षेत्रात मागे न राहता पुढे जाण्याचा संदेश दिला.
माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल म्हणाले, आजचा युवक हा भविष्याचा देशाचा कर्णधार आहे. त्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याकरिता अशा प्रशिक्षणाचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे सांगितले. नगराध्यक्ष जायस्वाल यांनी जिल्ह्यातील उपस्थित युवकांना कार्यशाळेतून प्रशिक्षण घेवून या क्षेत्रात यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले.
दरम्यान, प्रशिक्षक सुटे यांनी या कार्यशाळेत युवकाचे उंची व वजन घेतल्यावर त्यांना दोन दिवस या सेवेबद्दल मार्गदर्शन करून प्रशिक्षण देणार आहेत. सध्या ३०० जागा रिक्त असून येणाऱ्या काळात एअर इंडिया यासारखे पद भरण्याकरिता जाहिराती काढणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना याची संपूर्ण माहिती व्हावी यादृष्टीकोनातून ना. बडोले यांनी फार कमी वेळात ही कार्यशाळा आयोजित करून गोंदिया जिल्ह्यातील तरुणांना संधी देण्याचे कार्य केले आहे, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी मांडले. संचालन जयंत शुक्ला यांनी केले. आभार ऋषीकांत शाहू यांनी मानले. कार्यशाळेत सहभागी होण्याकरिता सकाळपासूनच हजारो युवक-युवतींनी मोठी गर्दी केली होती. कार्यशाळेसाठी भाजयुमोचे जिल्हा महामंत्री पंकज सोनवाने, ललीत मानकर, सुनील येरपुडे, तालुकाध्यक्ष बाबा चौधरी, गुड्डु डोंगरवार, राजू शाहू, संदीप कापगते, गौरी पारधी, बंटी श्रीबांसी, देवचंद नागपुरे, ललीत खजरे, अरविंद तिवारी, रितुराज मिश्रा, बंटी शर्मा, सतीश मेश्राम, विनोद बनसोडे, बालू बिसेन, प्रतिक तिवारी, पलाश लालवानी, कुशल अग्रवाल, राहुल खिलावत, अजय लौंगानी, शिवेंद्र तिवारी, नरवीश पटले, विवेक खंडाईत, निलेश गुप्ता, चेतन बुंबर, सनय पाचकवार आदी सहकार्य करीत आहेत. (प्रतिनिधी)