सडक-अर्जुनी व गोरेगाव तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 05:00 AM2021-06-14T05:00:00+5:302021-06-14T05:00:21+5:30
अवघ्या देशाची गाडी रुळांवर आली असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. सर्व काही अस्तव्यस्त करून दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. जिल्ह्यातही आता ती ओसरताना दिसत असून बाधितांची संख्या चांगलीच नियंत्रणात आली आहे. त्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने क्रियाशील रुग्णांची संख्या चांगलीच घटत चालली आहे. सुदैवाने दररोजच्या बाधितांची संख्या कमी व रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त असल्याने आता जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दुसऱ्या लाटेने कहर केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढली होती. यामुळेच जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४१ हजारांच्या घरात गेली आहे. मात्र, आता दुसरी लाट ओसरत असून बाधितांची संख्या चांगलीच घटली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे सडक-अर्जुनी व गोरेगाव तालुका आता कोरोनामुक्तीच्या वाटेवर दिसत आहे. यातील सडक-अर्जुनी तालुक्यात शनिवारी फक्त ४, तर गोरेगाव तालुक्यात ५ क्रियाशील रुग्ण उरले होते.
अवघ्या देशाची गाडी रुळांवर आली असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. सर्व काही अस्तव्यस्त करून दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. जिल्ह्यातही आता ती ओसरताना दिसत असून बाधितांची संख्या चांगलीच नियंत्रणात आली आहे. त्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने क्रियाशील रुग्णांची संख्या चांगलीच घटत चालली आहे. सुदैवाने दररोजच्या बाधितांची संख्या कमी व रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त असल्याने आता जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
सुखद बाब म्हणजे, यातच आता सडक-अर्जुनी व गोरेगाव तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर दिसून येत आहे. शनिवारी सडक-अर्जुनी तालुक्यात ४, तर गोरेगाव तालुक्यात ५ क्रियाशील रुग्ण होते. अशात येत्या दिवसांत हे दोन तालुके कोरोनामुक्त होणार यात शंका नाही. याशिवाय, अन्य तालुक्यांतही क्रियाशील रुग्णांची संख्या चांगलीच कमी झाली असून कोरोना असाच नियंत्रणास असल्यास तेही कोरोनामुक्त होणार आहे.
सर्वाधिक रुग्ण गोंदिया तालुक्यात
- जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हापासूनच गोंदिया तालुका हॉटस्पॉट ठरला आहे. सर्वाधिक बाधित व मृतांची संख्या गोंदिया तालुक्यातच सर्वाधिक आहे. हीच परिस्थिती आजही कायम असून गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ९१ क्रियाशील रुग्ण आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आमगाव तालुका असून तेथे ३० क्रियाशील रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, कधी दुसरा हॉटस्पॉट असलेला तिरोडा आता नियंत्रणात असल्याने तेथे क्रियाशील रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे.
प्रत्येकाने लस घेण्याची गरज
कोरोनाला पुढे आपले पाय पसरू द्यायचे नसल्यास सर्वांचे लसीकरण करण्याची गरज आहे, असे शास्त्रज्ञ सांगत आहेत. यामुळेच जिल्ह्यात लसीकरणासाठी मोहीम उघडण्यात आली असून गावागावांत लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. शिवाय, शिबिर घेऊन लसीकरण केले जात आहे. अशात आता नागरिकांनी लस घेऊन स्वत:सह आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित करण्याची गरज आहे.