सडक अर्जुनीची अवैध रेती गोरेगावात
By admin | Published: October 6, 2016 12:58 AM2016-10-06T00:58:15+5:302016-10-06T00:58:15+5:30
सडक अर्जुनी तालुक्यातून अवैध रेती गोरेगाव तालुक्यात येत आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे.
तहसीलदाराची कारवाई : पाच ट्रॅक्टरवर ५२५०० रुपयाचा दंड
दिलीप चव्हाण गोरेगाव
सडक अर्जुनी तालुक्यातून अवैध रेती गोरेगाव तालुक्यात येत आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. तरीही महसूल विभाग कारवाई करीत नाही. सडक अर्जुनी तालुका महसूल विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. तर गोरेगावचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी पाच ट्रॅक्टरवर कारवाई करीत ५२ हजार ५०० रुपये दंड ठोठावला आहे.
सडक अर्जुनी येथून विना रॉयल्टी रेतीचे अवैध उत्खनन करुन ती रेती गोरेगावात विकली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रात्री १२ च्या नंतर ट्रॅक्टरने रेती येत आहे. हा प्रकार राजरोषपणे सुरू आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाला लाखोचा भूर्दंड बसत आहे.
दरदिवशी रात्रीच्या वेळी २५ ते ३० ट्रॅक्टरने रेती येत असल्याने त्यांच्यावर येथील ट्रॅक्टर चालक-मालक असोसिएशनची नजर होती. ४ सप्टेंबर २०१६ रोजी रात्रीला रेती भरुन आलेल्या ट्रॅक्टरला गोरेगावचे नायब तहसीलदार एस.एम. नागपुरे, कोतवाल पुरुषोत्तम रहांगडाले, कोतवाल विकास चाचेरे, कमलेश बघेले यांनी ट्रॅक्टर असोसिएशनच्या मदतीने सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले. जप्तीची कारवाई करण्यात आली. यात ट्रॅक्टर मालक भागेश्वर चव्हाण रा. बोथली (ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ जी ६९६६, ट्रॉली क्रमांक एम.एच. ३५ एफ १९३४), मुन्ना अनंतरराम वरखडे रा. बक्कीटोला (एमएच ३५ जी ६२३२, ट्रॉली क्रमांक नाही), गजानन परशुरामकर रा. खाडीपार (एम.एच.३५ जी ७५७७, ट्रॉली क्रमांक एमएच ३५ जी.पी. ४८२५), गजानन परशुरामकर रा. खाडीपार (ट्रॉली क्रमांक एम.एच. ३५/६२६५), मेघनाथ सखाराम उंदिरवाडे ( ट्रॅक्टरला नंबर नाही) या ट्रॅक्टर मालकांवर कारवाई करण्यात आली.
२४६ रेती माफियांवर कारवाई
नऊ महिन्यापूर्वी तहसीलदार कल्याणकुमार डहाट ( १ जानेवारी २०१६) गोरेगाव तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून रुजू झाले. रुजू होताच तहसीलदार डहाट यांनी २४६ ट्रॅक्टर मालकावर कारवाई केली. या कारवाईतून शासनाच्या तिजोरीत १८ लाख २२ हजार २०० रूपये महसूल जमा केला. तहसीलदाराच्या दहशतीमुळे ट्रॅक्टर मालकांनी अवैध काम बंद केले.
५२५०० रुपये दंड
अवैध रेती विक्रीस आणणाऱ्या त्या पाच ट्रॅक्टर मालकावर प्रत्येकी १०,५०० प्रमाणे दंड ठोठावण्यात आला आहे.एकूण ५२,५०० रुपये महसूल विभागात जमा करण्यात आले आहे. सडक अर्जुनी तालुक्यातून दरदिवशी रात्रीच्या वेळेस विना क्रमांकाचे ट्रॅक्टर गोरेगाव परिसरात रेतीची तस्करी करतात. मात्र आरटीओ कारवाई शुन्य आहे.