सुधारित शेतीत सडक अर्जुनी ‘नंबर वन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 10:14 PM2018-05-19T22:14:03+5:302018-05-19T22:14:03+5:30
जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुका सुधारीत शेतीकडे वळल्याने पहिल्या क्रमांकाचा ठरला आहे. सडक-अर्जुनी तालुक्याचे मुख्य धानपिक हे होते. पण परंपरागत शेतीत बदल करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शनात राहून शेतकऱ्यांनी शेतीत पिकविलेला टरबूज विदेशात, भेंडी छत्तीसगड राज्यात....
राजेश मुनिश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुका सुधारीत शेतीकडे वळल्याने पहिल्या क्रमांकाचा ठरला आहे. सडक-अर्जुनी तालुक्याचे मुख्य धानपिक हे होते. पण परंपरागत शेतीत बदल करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शनात राहून शेतकऱ्यांनी शेतीत पिकविलेला टरबूज विदेशात, भेंडी छत्तीसगड राज्यात तर इतर भाजीपाला मोठ मोठ्या शहरात बाजारपेठेत जायला लागला आहे.
मागील वर्षभरापासून सडक-अर्जुनीचे तालुका कृषी अधिकारीपद रिक्त आहे. अर्जुनी-मोरगावचे कृषी अधिकारी डी.एल.तुमडाम यांच्याकडे अतिरीक्त कारभार आहे. सडक-अर्जुनीचे मंडळ कृषी अधिकारीचे पद रिक्त आहे. सडक-अर्जुनीचे कृषी पर्यवेक्षक सी.एस.आकरे यांच्याकडे अतिरीक्त प्रभार आहे.अतिरीक्त प्रभारातही सडक-अर्जुनी तालुका नंबर वन आहे. तांत्रीक कृषी अधिकारी रोषणा कोराम हे आहेत. दुसरे कृषी पर्यवेक्षक मनोज भालाधरे आहेत.
तालुक्यात ठिकठिकाणी ११ कृषी सहायक आहेत. त्यातही एका कृषी सहाय्यकाकडे १० ते १२ गावे आहेत. १० ते १२ गावांची धुरा सांभाळून शेतकऱ्यांना वेळोवेळी कृषी मार्गदर्शन होत आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी कोहळी येथील अॅपल बोर जिल्ह्यात विकली गेली. डाळींबाचा पहिला प्रयोग सिंदीपार गावात करण्यात आला. त्यात शंकर लंजे, मुनेश्वर कापगते, डॉ. दिलीप कापगते (चिचटोला) यांनी यशस्वी करुन दाखविला. गोंदिया जिल्ह्यात डाळींबाच्या शेतीचा एकमेव प्रयोग सिंदीपार चिचटोला येथेच घेण्यात आला.
सडक-अर्जुनी तालुक्यात सुधारीत शेती चिचटोला, सिंदीपार, घाटबोरी, कोकणा जमींदारी, खोडशिवनी, रेंगेपार, चिखली, राका, तिडका, फुटाळा, डव्वा, कोसमतोंडी, सौंदड, सहाकेपार, जांभळी येथे केली जात आहे. सध्या तालुक्यात ११०४ हेक्टर आर क्षेत्रात उसाची लागवड केली आहे. तर ५०.०९ हेक्टर आर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. भाजीपाला २५९ हेक्टर आर क्षेत्रात लावण्यात आला आहे. भेंडींची सर्वात जास्त लागवड राका गावात करण्यात आली आहे. विविध पिकांना ठिंबक सिंचनाचा वापर करुन सुधारीत शेती करीत आहेत. सेंद्रीय खताचे माध्यमातून भरघोस उत्पन्न कसे घेता येतो. याचे प्रात्यक्षिके दाखवून शेतकऱ्यांना कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर कमी करण्यावर भर दिला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील एकूण शेतीपैकी सिंचनाखाली येणारे क्षेत्र १० हजार ७०१ हेक्टर आर क्षेत्र आहे. तालुक्यातील शेतकºयांचा कल इतर पिकांकडे वाढत आहे.
१६६ शेतकऱ्यांना रोटाव्हेटर
उन्नत शेती-समृध्द शेतकरी योजनेंतर्गत कृषी अभियांत्रीकी औजारे वाटप करण्यात येते. यात ट्रॅक्टर, रोटाव्हेटर १६६ वाटप करण्यात आले. शतकोटी वृक्ष लागवड १०० हेक्टर आर क्षेत्रात लावण्यात आले. ठिंबक तुषार सिंचन योजनेंतर्गत तालुक्यातील १४० शेतकºयांना लाभ देण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत भातखाचर पुनरूज्जीवन, बोडी, नूतनीकरण आदी कामे झाली आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत पॅक हाऊस-२, मल्चींग ६५ हेक्टर आर क्षेत्रात देण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नाडे टाकी (गांडूळ खत) तयार केले आहेत.