अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची लागली वाट ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:30 AM2021-05-08T04:30:13+5:302021-05-08T04:30:13+5:30
रावणवाडी : गोंदिया तालुक्यातील बनाथर, कासा, तेढवा, जिरुटोला परिसरातील वाळूृघाटांचा लिलाव सुरू झाला नाही. तरीही मोठ्या प्रमाणात अवैध वाळू ...
रावणवाडी : गोंदिया तालुक्यातील बनाथर, कासा, तेढवा, जिरुटोला परिसरातील वाळूृघाटांचा लिलाव सुरू झाला नाही. तरीही मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. वाळूचे ट्रॅक्टर रात्रंदिवस धावत असल्याने गावकुसातील रस्ते उखडले आहेत. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे.
गोंदिया तालुक्यातील वाळूघाटांतून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूचे उत्खनन केले जात आहे. वाळू भरून जाणाऱ्या ट्रॅक्टरमुळे कासा, जिरुटोला, कोरणी, बनाथर, तेढवा रस्त्याची स्थिती खराब झाली आहे. विशेष म्हणजे वाळूमाफियांना महसूल विभागाचे अधिकारी कारवाईसाठी येत असल्याची माहिती सुरुवातीलाच मिळत असते. ते आपल्या जवळची व्यक्ती रावणवाडीपासून घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर तैनात करीत असतात. हे व्यक्ती अधिकारी, कर्मचारी येत असल्याची सूचना माफियांना देत असतात. कधीकाळी सेटिंग करून कर्मचाऱ्यांना मोकळे करीत असतात. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. प्रशासकीय अडचणीमुळे वाळूघाटांचा लिलाव झाला नसल्याचे बोलले जाते. वाळूमाफिया गावातील कच्चे रस्ते आणि पांगडी रस्त्यावरुन वाळूची वाहतुक करीत असल्याने रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वाळूमाफियांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी होत आहे.