घोगरा ते देव्हाडा रस्ता देतोय अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:26 AM2021-03-14T04:26:42+5:302021-03-14T04:26:42+5:30
घोगरा ते देव्हाडा हा मुख्य रस्ता असून, या रस्त्याने बरेच नागरिक, तसेच शाळेकरी विद्यार्थी तुमसर येथे शिक्षणासाठी जातात. देव्हाडा ...
घोगरा ते देव्हाडा हा मुख्य रस्ता असून, या रस्त्याने बरेच नागरिक, तसेच शाळेकरी विद्यार्थी तुमसर येथे शिक्षणासाठी जातात. देव्हाडा या गावी दर बुधवारी आठवडी बाजार भरतो व त्यामुळे घाटकुरोडा येथील अनेक नागरिक भाजीपाला विकण्याकरिता देव्हाडा येथे जातात. देव्हाडा येथील एलोरा पेपर मिल असून, या पेपर मिलमध्ये घोगरा व पाटीलटोला येथील कामगार रात्री-बेरात्री पेपरमिल येेथे कामावर जातात. एखाद्या व्यक्तीची प्रकृती जास्त बिघडली तर याच मार्गाने तुमसर येथील दवाखान्यात न्यावे लागते. घोगरा ते देव्हाडा हा मुख्य रस्ता असून, देव्हाड्याहून नागपूर ते गोंदिया महामार्गाला जुळला आहे.
देव्हाडा येथून गोंदिया ते नागपूर एसटी बस नेहमीच धावत असतात. या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते व त्यामुळे हा रस्ता जीर्ण झाला असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. रस्त्यावरील गिट्टी व मुरूम उखडून बाहेर आले आहे. या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिक व विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करून रस्ता पार करावा लागतो. त्यामुळे अनेकांची तारेवरची कसरत होते. विशेष म्हणजे, तुमसर आगाराची तुमसर ते तिरोडा व्हाया घाटकुरोडामार्गे प्रवासी बस या जीर्ण रस्त्यामुळे बंद करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांचे हाल होत आहेत.
या मार्गावर आता कोणतीच बस नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. संबंधित अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.