कचारगडचा जंगली मार्ग होणार प्रकाशमान

By Admin | Published: February 5, 2017 12:07 AM2017-02-05T00:07:40+5:302017-02-05T00:07:40+5:30

येत्या बुधवारपासून (दि.८) सुरू होत असलेली कचारगड यात्रा यावर्षी भाविकांसाठी अधिक सुलभ होणार आहे.

The road to Kachargad will be a wild route | कचारगडचा जंगली मार्ग होणार प्रकाशमान

कचारगडचा जंगली मार्ग होणार प्रकाशमान

googlenewsNext

एबी केबलमधून वीज पुरवठा : महावितरणची ४६ लाख रूपयांची योजना
गोंदिया : येत्या बुधवारपासून (दि.८) सुरू होत असलेली कचारगड यात्रा यावर्षी भाविकांसाठी अधिक सुलभ होणार आहे. कारण महावितरण व महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाच्या संयुक्तवतीने कचारगडच्या मार्गावर एरियल बंच केबलच्या माध्यमातून प्रथमच विजेची सोय करण्यात आली आहे. ४५ लाख ७३ हजार रूपयांच्या विशेष योजनेतून हे काम करण्यात आले असून यामुळे कचारगडचा मार्ग संध्याकाळीही प्रकाशमान राहणार आहे.
आदिवासी गोंडी समाज बांधवांचे आद्य दैवत पारी कोपार लिंगो, जंगो, मॉं काली कंकाली देवस्थान सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे आहे. जंगलाने व्याप्त पहाडी परिसरात असलेले हे देवस्थान दुर्गम असून दरवर्षी येथे यात्रेदरम्यान विविध राज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. जंगलव्याप्त परिसर असल्याने येथे आतापर्यंत वीज पुरवठा झालेला नव्हता. कचारगड देवस्थानापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या धनेगाव नंतर पुढे वीजेची सोय नव्हती. त्यामुळे भाविकांना संध्याकाळच्या आत गुफेतून धनेगावला पोहोचावे लागत होते.
लाखो भाविकांच्या भावना लक्षात घेत व या देवस्थानामुळे देश-विदेशात जिल्ह्याची ख्याती असल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांच्या कार्यकाळात डीपीडीसीतून ४५ लाख ७३ हजार रूपयांची वीज पुरवठ्याची योजना जिल्हा पर्यटन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली होती. त्याअंतर्गत आता येत्या ८ ते १२ तारखेपर्यंत कचारगड येथे यात्रा भरणार असल्याने महावितरणकडून कचारगड यात्रेसाठी वीज पुरवठ्याची सोय करण्यात आली आहे.
यासाठी महावितरणने धनेगावपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कचारगड देवस्थानपर्यंत एरियल बंच केबलच्या माध्यमातून वीज लाईन टाकली आहे. यात तीन किलोमीटर उच्चदाब तर एक किलोमीटर लघुदाब वाहिनी टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे लाईन टाकण्याचे काम झाडांना कोणत्याही प्रकारची इजा न पोहचविता करण्यात आले आहे. शिवाय यापासून भाविकांनाही काही त्रास होणार नाही याची दक्षता महावितरणकडून घेण्यात आली आहे. यामुळे आता यंदाच्या यात्रेत प्रथमच भाविकांना अंधाराचा सामना करावा लागणार नाही.
महावितरणकडून ही सर्व कामे करण्यात आली असून गुरूवारी मुख्य अभियंता पारधी व अधीक्षक अभियंता एल.एम.बोरीकर यांनी वीज पुरवठा संबंधीत विविध बाबींचे जातीने निरीक्षक केले. तर या कामासाठी सहकार्य करणारे देवरी विभागाचे कार्यकारी अभियंता वाकडे, विवेक गजभिये, प्रदीप राऊत, बोंद्रे, कचारगड देवस्थानचे उपाध्यक्ष रमणलाल सलाम याप्रसंगी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

१६ पथदिवे लावले जाणार
कचारगड देवस्थानात जाताना देवस्थानापासून सुमारे एक किलोमीटर पूर्वी असलेल्या पहाडापासून ते देवस्थानापर्यंत १६ पथदिवे महावितरणकडून लावण्यात येणार आहे. महावितरणकडून ही कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली असून यापुढे भाविकांना यात्रेत जाताना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. याशिवाय १०० केव्ही क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर लावण्यात आले असून धनेगाव ते पहाडपर्यंत त्यातून तात्पुरते कनेक्शन दिले जाणार असून पथदिव्यांची सोय केली जाणार आहे.

 

Web Title: The road to Kachargad will be a wild route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.