निमगाव प्रकल्पाचा मार्ग झाला मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:47 PM2019-07-19T23:47:39+5:302019-07-19T23:48:08+5:30
तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या निमगाव सिंचन प्रकल्पाचे मागील ४० वर्षांपासून रखडले होते. यात वन विभागाची जमीन येत असल्याने हा प्रकल्प रेंगाळलेला होता. परिणामी या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या निमगाव सिंचन प्रकल्पाचे मागील ४० वर्षांपासून रखडले होते. यात वन विभागाची जमीन येत असल्याने हा प्रकल्प रेंगाळलेला होता. परिणामी या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत होते. दरम्यान आ.विजय रहांगडाले यांनी या प्रकल्पाचा मुद्दा केंद्र आणि राज्य शासनाकडून लावून धरुन या प्रकल्पातील अडचणी दूर करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे वन्यजीव मंडळाची मंजुरी मिळाल्याने निमगाव प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
निमगाव प्रकल्प १९७२ ते ते २००६ पर्यंत रखडलेला होता. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी प्रयत्न केले होते. तसेच यासाठी भंडारा-नागपूर-भोपाल येथील कार्यालयात पत्रव्यवहार सुध्दा करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही या प्रकल्पाचे काम पुढे सरकत नव्हते. आ.रहांगडाले यांनी २०१५ पासून या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी कागदपंत्रासह पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वनमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडे वांरवार पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र शासनाद्वारे वन विभागाला प्रकल्पाकरिता लागणाऱ्या जमिनीचे एफआरए निधी ३१ कोटी रुपये राज्य मंत्रीमंडळाद्वारे केंद्र शासनाकडे भरण्यात आले. ज्यामध्ये वनविभागाची जमीन व झाडाच्या किंमतीचा सुद्धा समावेश करण्यात आल्या नंतरच राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला. निमगाव प्रकल्प हा नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असल्यामुळे १० कि.मी.अंतरातील प्रकल्पास वन्यजीव मंडळाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. यामध्ये केंद्रीय वन्यजीव मंडळाचे प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरीकरिता चित्रफितीसह संपूर्ण अहवाल सादर करण्याकरिता प्रत्यक्ष राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाचे सचिव श्रीकांत कामडी यांनी आंबे नाल्याची २२ मे २०१९ रोजी पाहणी केली. निमगाव प्रकल्पाचे कार्य ६० टक्के पूर्ण झाले असून तलावाच्या सुरक्षा भिंतीला पिचिंग, वेस्ट वेअर, कालवा निर्मिती व अन्य कार्य पूर्ण झाले आहे. रहांगडाले यांनी १० जून २०१९ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची दिल्ली येथे भेट घेऊन या प्रकल्पाच्या मार्गातील अडचणी दूर केल्या.
पाचशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
बºयाच वर्षांपासून रखडलेला निमगाव सिंचन प्रकल्प मार्गी लागल्यामुळे या तालुक्यातील ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.याचा लाभक्षेत्रातील १८ गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शिवाय शेतकºयांना दुष्काळाशी दोन हात करण्यास याची मोठी मदत होणार आहे.
वन्यप्राण्यांना पाण्याची सोय
निमगाव प्रकल्प हा बफर झोनमध्ये असल्यामुळे शेतीच्या सिंचनाव्यतिरिक्त नागझिरा वन्यजीव अभयारण्य अंतर्गत असलेल्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. १७ जुलै रोजी झालेल्या बैठकीत केंद्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी मिळालेली असून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे.