रस्त्यावरील खड्डे झाले जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:29 PM2019-09-09T23:29:38+5:302019-09-09T23:30:01+5:30
कामठा ते आमगावकडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येतो. कामठा ते आमगाव मार्गे मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील जडवाहन, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनांची दिवसभर वर्दळ असते. यापूर्वी या रस्त्याची दुरूस्ती कंत्राटदारामार्फत करण्यात आली. मात्र रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आल्याने अल्पावधीतच या रस्त्याचे बारा वाजले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : तालुकास्थळापासून भोसा ते पांजरा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहे. या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचले असल्याने त्यांना गटारांचे स्वरुप प्राप्त झाले असून यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र अद्यापही याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरूस्ती केली नाही. परिणामी या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांची समस्या कायम आहे.
कामठा ते आमगावकडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येतो. कामठा ते आमगाव मार्गे मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील जडवाहन, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनांची दिवसभर वर्दळ असते. यापूर्वी या रस्त्याची दुरूस्ती कंत्राटदारामार्फत करण्यात आली. मात्र रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आल्याने अल्पावधीतच या रस्त्याचे बारा वाजले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन वाहने चालवितांना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामार्गे नोकरी करणारे, व्यावसायीक, मजूर, शेतकरी, विद्यार्थी येथून ये-जा करतात.त्यांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावर भोसा-पांजरा, कट्टीपार-किकरीपार, बनगाव,आमगाव येथे मोठ्ठे खड्डे पडल्याने प्रवाशांना जिव मुठीत घेऊन जावे लागते. याच ठिकाणी चार व्यक्तींचा या खड्यात पडून नाहक बळी गेल्याची घटना घडल्या आहेत.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच सुनील ब्राम्हणकर, हुलासराम बहेकार, श्रावण बागडे, शंकर कारंजेकर, लोकेश तरोणे, विनोद मटाले, रमेश क्षीरसागर, तिलकचंद मटाले, मंगरु मटाले, जनकराम ब्राम्हणकर, चिंतामन कारंजेकर,खुशाल वाढई, विनोद कारंजेकर, हिरामन फरकुंडे, मन्नालाल कांबळे, सुरजलाल शेंडे, खेमराज कोसरे,नवीन कोसरे, योगेश फरकुंडे, रमेश घराडे, रामकिसन कोल्हाटकर, वासुदेव ब्राम्हणकर, संजय मटाले, सुनील मटाले, मुन्नालाल मटाले, शंकर फुंडे, संजय मेश्राम, संजय शिवणकर, राजकुमार मटाले यांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीचा अभाव
सार्वजनिक बांधकाम विभाग आमगावकडे खड्डे बुजविण्याकरिता किंवा डागडुजी करण्यासाठी निधी नसल्याचे कारण पुढे करुन रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.