जिल्ह्यातील भाजीपाला,मका,टरबूज उत्पादक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 05:00 AM2020-05-04T05:00:00+5:302020-05-04T05:00:15+5:30

‘लॉकडाऊन’मुळे सर्वच उद्योगधंदे आणि वाहतुकीची साधने ठप्प होती. याचा फटका व्यावसायीक व यावर अवलंबून असणाºयांना बसलाच. मात्र सर्वाधिक कोंडी आणि नुकसान झाले ते शेतकऱ्यांचे. मागील २-३ वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटाला तोंड देत आहे. त्यांच्या नशिबी कधी गारपीट, अवकाळी पाऊस तर कधी किडरोगांचा प्रादुर्भाव सातत्याने येत असल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.

On the road producing vegetables, maize, watermelon in the district | जिल्ह्यातील भाजीपाला,मका,टरबूज उत्पादक रस्त्यावर

जिल्ह्यातील भाजीपाला,मका,टरबूज उत्पादक रस्त्यावर

Next
ठळक मुद्देहमीभाव केंद्राचा अभाव : शेतातच सडला शेतमाल, शेतकऱ्यांची सर्वच बाजूने कोंडी

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मागील जवळपास दीड महिन्यापासून ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदी आहे. या ‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील भाजीपाला,मका व टरबूज उत्पादकांना बसला असून भाजीपाला आणि टरबूजची विक्री न करता आल्याने त्यांच्या शेतातच हा माल सडला. परिणामी शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च भरुन न निघाल्याने त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे. आधीच कर्ज काढून मोठ्या अपेक्षेने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जबाजारी होवून पुन्हा सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.
‘लॉकडाऊन’मुळे सर्वच उद्योगधंदे आणि वाहतुकीची साधने ठप्प होती. याचा फटका व्यावसायीक व यावर अवलंबून असणाºयांना बसलाच. मात्र सर्वाधिक कोंडी आणि नुकसान झाले ते शेतकऱ्यांचे. मागील २-३ वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटाला तोंड देत आहे. त्यांच्या नशिबी कधी गारपीट, अवकाळी पाऊस तर कधी किडरोगांचा प्रादुर्भाव सातत्याने येत असल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. त्यातच यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने गोरेगाव, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव या भागातील शेतकऱ्यांनी चारपैसे शिल्लक पडावे व जोडधंदा म्हणून भाजीपाल्याची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी टरबुजची वाडी लावली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास १ हजार हेक्टरवर मक्याची लागवड केली. सुदैवाने यंदा या सर्वांना पिकांना अनुकुल वातावरण मिळाल्याने त्यांची चांगली वाढ झाली.
दरवर्षी लग्नसराईच्या काळात भाजीपाल्यासह काकडीची सुद्धा मोठी मागणी असते. उन्हाळ्याचे ४ महिने टरबूज व डांगरांंची सुद्धा मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपानंतर कुटुंबासह शेतात राबून आणि रक्ताचे पाणी करुन या पिकांची शेती केली. यंदा भाजीपाला, टरबूज व मक्याचे पीक सुद्धा चांगले आले होते. त्यामुळे चार पैसे नक्कीच शिल्लक राहतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र या सर्वावर ‘लॉकडाऊन’मुळे पाणी फेरल्या गेले. चारपैसे शिल्लक राहणे दूरच राहिले लागवडीसाठी लावलेले पैसे निघाले नाही. सडक-अर्जुनी तालुक्यातील शेतकरी २०० एकरवर टरबुजाची लागवड करतात. तर काकडीसह भाजीपाला पिकाची जवळपास ५०० एकरवर लागवड केली. मात्र ‘लॉकडाऊन’मुळे लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रम रद्द झाले असल्याने काकडीला मागणीच नाही. परिणामी ५ एकरातील काकडी शेतातच वाळली. एकीकडे नैसर्गिक संकटाला तोंड देत असताना कोरोनामुळे करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. परिणामी आता खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी पैशांची जुळवाजुळव कशी करावी ही चिंता सतावित असल्याचे सडक-अर्जुनी तालुक्यातील भागवत चुटे, सुरेश मेश्राम, मोरेश्वर चुटे या शेतकऱ्यांनी सांगितले.
‘लॉकडाऊन’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने सोन्यासारखे पीक मातीमोल होत असल्याचे पाहून शेतकºयांच्या डोळ्यात अश्रू आले. एकंदरीत ‘लॉकडाऊन’मुळे सर्वाधिक नुकसान भाजीपाला व टरबूज उत्पादकांचे झाले आहे.

दोन हजार रुपये क्विंटलचा भाव ७०० रुपयांवर
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा १ हजार हेक्टरवर मक्याची लागवड होती. सुदैवाने हे पीक सुद्धा चांगले असून ते आता शेतकऱ्यांच्या हाती आले आहे. मात्र अद्यापही हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने खासगी व्यापारी मक्याची अंत्यत कमी दराने खरेदी करीत आहे. मागील वर्षी मका हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १७५० ते दोन हजार रुपये प्रती क्विंटल हमीभाव मिळाला होता. मात्र यंदा ‘लॉकडाऊन’मुळे शासकीय हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना ७००-८०० रुपये प्रती क्विंटल दराने मका विक्री करण्याची वेळ आली आहे.
धान घरातच पडून
देशात सर्वत्र २४ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करणे शक्य झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल धान घरात तसाच पडून आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम कसा करावा अशी चिंता त्यांना सतावित आहे.

कोकणा परिसरात माझ्यासह अन्य शेतकऱ्यांनी २०० एकरवर टरबूज व डांगराची लागवड केली होती. मात्र ‘लॉकडाऊन’मुळे मालाची वाहतूक आणि विक्री करता न आल्याने सर्व टरबूज शेताच पडून राहिल्याने सडले. तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देखील नुकसान झाले.
- शिवाजी गहाणे, कोकणा (टरबूज उत्पादक शेतकरी)
मी ५ एकरवर काकडीची लागवड केली होती. सुदैवाने यंदा काकडीचे पीक चांगले आले होते. मात्र ‘लॉकडाऊन’मुळे काकडीला मागणी नसल्याने व वाहतुकीची अडचण आल्याने ५ एकरातील काकडी शेतातच वाळली. त्यामुळे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.
- लहू डोंगरवार, रेंगेपार, (काकडी उत्पादक शेतकरी)

Web Title: On the road producing vegetables, maize, watermelon in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.