फटाका सायलेन्सरवर चालविला रोडरोलर; वाहतूक नियंत्रण शाखेचा प्रयोग

By कपिल केकत | Published: December 12, 2023 07:38 PM2023-12-12T19:38:00+5:302023-12-12T19:39:17+5:30

फॅन्सी नंबरप्लेट्स व प्रेशर हॉर्नही केले 'स्वाहा'

Roadroller driven on firecracker silencer; Traffic Control Branch experiment | फटाका सायलेन्सरवर चालविला रोडरोलर; वाहतूक नियंत्रण शाखेचा प्रयोग

फटाका सायलेन्सरवर चालविला रोडरोलर; वाहतूक नियंत्रण शाखेचा प्रयोग

कपिल केकत, गोंदिया: कानठळ्या वाजविणाऱ्या फटाका सायलेन्सर व प्रेशर हॉर्नमुळे शहरवासीय चांगलेच वैगातले आहेत. अशात त्यांच्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे वाहतूक नियंत्रण शाखेने असे ५८ सायलेन्सर व प्रेशर हॉर्न जप्त केले असून, मंगळवारी (दि. १२) त्यांच्यावर रोडरोलर चालविला. येथील जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीसमोर सायंकाळी शहरवासीयांच्या डोळ्यांदेखत हा प्रयोग करण्यात आला.

शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. त्यातही काही बहाद्दर आपले वाहन काही वेगळे असावे व सर्वांना आकर्षूण घेण्यासाठी त्यात नवनवे जुगाड करतात. यामध्ये फटाका सायलेन्सर लावले जाते, तर कित्येक जण वेगवेगळे आवाज करणारे किंवा प्रेशर हॉर्न लावतात. असले वाहन रस्त्याने कर्णकर्कश आवाज करीत गेल्यावर मात्र नागरिकांच्या कानठळ्या वाजतात. सततच्या अशा आवाजाने तर डोकेदुखी होऊ लागते. या फटाका सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषण होत असून, शहरवासीय अशा वाहनांमुळे पार वैतागले आहेत. यामुळेच अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती.

शहरवासीयांची मागणी व त्यांना होणारा त्रास लक्षात घेत वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक किशोर पर्वते यांनी त्यांच्या विभागाला अशा फटाका सायलेन्सर व प्रेशन हॉर्न असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यातूनच वाहतूक पोलिसांनी ५८ फटाका सायलेन्सर व प्रेशर हॉर्न जप्त केले होते. मंगळवारी (दि. १२) शहरातील प्रशासकीय इमारतीसमोर या सायलेन्सर व प्रेशर हॉर्नवर रोडरोलर चालवून त्यांचा नायनाट करण्यात आला.

नागरिकांत जनजागृतीचा उद्देश

- फटाका सायलेन्सर व प्रेशर हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामुळे शहरवासीय चांगलेच वैतागले आहेत, तर आपल्या वाहनांमध्ये यांचा वापर करणाऱ्यांसाठी हे आकर्षण व कमरवणुकीचे साधन बनले आहे. मात्र, यामुळे ध्वनिप्रदूषण होत असून, नागरिकांना त्यापासून त्रास होतो. अशात असे फटाका सायलेन्सर व प्रेशर हॉर्न लावणे नियमाविरुद्ध असल्याने कुणीही यांचा वापर करू नये व केल्यास त्याचे काय केले जाते हे दाखवून देत नागरिकांत जनजागृती करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने मंगळवारी जनतेसमोर हा प्रयोग केला.

फॅन्सी नंबरप्लेट आणणार अडचणीत

- सध्या तरुणांमध्ये फॅन्सी नंबरप्लेटची फॅशन आली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे, देवी-देवतांचे चित्र असलेले अशा विविध प्रकारच्या फॅन्सी नंबरप्लेट लावून ते वाहन चालवितात. मात्र, वाहतूक नियमांत हा गुन्हा असून, कित्येकदा तो त्या वाहनचालकासाठीच धोकादायक ठरू शकतो. यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेने अशा २५ फॅन्सी नंबरप्लेट जप्त करून त्यांनाही रोडरोलरखाली स्वाहा केले.

मोडीफाईड वाहन पोलिसांच्या रडारवर

- शहरात सध्या तरुणांकडून जुनाट वाहनांना रंग लावून तसेच फटाका सायलेन्सर वगैरेंचा वापर करून मोडीफाय करण्याचा प्रकार दिसून येत आहे. ध्वनी व वायूप्रदूषण करणारे वाहन शहरवासीयांसाठी चांगलेच डोकेदुखीदायक ठरत आहेत. अशी काही वाहने वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त केली असून, तशी वाहने आढळून आल्यास ती वाहने जप्त केली जाणार आहेत.

फटाका सायलेन्सर व प्रेशर हॉर्नचा वापर ध्वनिप्रदूषण करीत असतानाच नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. शिवाय फॅन्सी नंबरप्लेटसुद्धा वाहतूक नियमांच्या विरुद्ध आहे. यामुळे कुणीही त्यांचा वापर करू नये. अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.
-किशोर पर्वते, निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया

Web Title: Roadroller driven on firecracker silencer; Traffic Control Branch experiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.