मंत्र्यांच्या धास्तीने रस्त्यांना नववधूचा साज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:09 PM2017-11-18T22:09:32+5:302017-11-18T22:10:04+5:30
संतोष बुकावन ।
आॅनलाईन लोकमत
अर्जुनी मोरगाव : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील रविवारी (दि.१९) रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गडचिरोलीवरुन ते वाहनाने गोंदिया येथे येणार आहेत. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक ११ ची डागडूजी करुन नववधूसारखे सजविण्याच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभाग व्यस्त असल्याचे चित्र आहे.
राज्यातील प्रमुख मार्गावरील खड्डयांवरुन सरकारची चांगलीच खिल्ली उडविली जात आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महिनाभरात रस्त्यांवरीेल खड्डे बुजविण्यात येतील असे आश्वासन दिले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यांवरील खड्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले. सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. रविवारी ते गडचिरोली येथील आढावा बैठक आटोपून राज्य महामार्ग क्रमांक ११ ने गोंदियाला येणार आहे. त्यामुळे त्यांच्या आगमनापूर्वी हा रस्ता खड्डे मुक्त करण्याच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभाग लागला आहे.
प्रमुख राज्य महामार्ग ११ वर सुकळी फाटा ते बरडटोली दरम्यान रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था आहे. या रस्त्यावर गेल्या सहा महिन्यापूर्वी काम झाले होते. रस्त्याच्या एका भागाचे काम करण्यात आले. मात्र दुसºया भागाचे काम करण्यात आले नव्हते. ज्या एका भागाचे काम करण्यात आले.
त्या रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे पडले. आधीच दुसऱ्या बाजूला खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे या रस्त्याने प्रवास कसा करावा ही मोठी तारेवरची सर्कस वाहन चालकांना करावी लागते. शासनाला जनता जनार्धनापेक्षा मंत्र्याचे मोल अधिक आहे की काय कुणास ठाऊस? रविवारी या रस्त्याने मंत्री येणार आहेत, म्हणून हा रस्ता आता नववधूसारखा सजू लागला आहे. या रस्ता बांधकामाच्या गुणवत्तेविषयी शंकाच उपस्थित केल्या जात आहेत.
लोकमतने वेधले होते लक्ष
प्रमुख राज्य महामार्ग ११ वर सुकळी फाटा ते बरडटोली या मार्गासह अन्य रस्त्यांवरील खड्डयांचा प्रश्न लोकमतने लावून धरला होता. तसेच या संदर्भातील वृत्त ९ नोव्हेबरच्या अंकात प्रकाशीत केली होती. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.
खड्डयांमुळे वाहतूक साकोली मार्गे
अर्जुनी मोरगाव शहराबाहेरील मोरगाव रोड टी प्वार्इंटपासून तर बरडटोली पर्यंत ठिकठिकाणी रस्त्यावर लांबच लांब खड्डे आहेत. छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातून आंध्रप्रदेश व तेलंगाना राज्यात या प्रमुख राज्य महामार्गाने मोठी वाहतूक होत असते. या रस्त्यावर प्रचंड खड्डेच खड्डे पडलेले असल्याने ही वाहतूक नाईलाजाने साकोली-लाखांदूर-वडसा या मार्गाने वळती करावी लागते. या मार्गाची रुंदी कमी असून या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते.
खड्डयांमुळे वाढले अपघात
या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्यात वाहन आदळून मोठे नुकसान सुद्धा होत असल्याच्या तक्रारी आहेत. तर खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात छोटे-मोठे अपघात घडले आहेत. यात काही जणांना जीव देखील गमवावा लागला. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीतपणा तर कारणीभूत आहेत. पण याच मार्गाने अनेकदा लोकप्रतिनिधी, मंत्री ये-जा करतात मात्र त्यांचे जनसामान्यांच्या समस्यांशी सोयरसूतकच नसल्याचे यावरुन स्पष्ट होते. प्रमुख राज्य महामार्ग क्र.११ या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाकर्तेपणा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळेच वाहनधारकांची ससेहोलपट होत असल्याचा आरोप केला जात आहे. अर्जुनी मोरगाव ते सुकडी फाटा दरम्यान तयार केलेल्या एकेरी मार्गाच्या बांधकामावेळी डांबराचे प्रमाण कमी असल्याने गिट्टी उखळून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. या रस्त्याने ये-जा करताना वाहनाने हेलकावे घेतले नाही तर नवलच. वाहन चालकांना वाहन कुठून घेवून जायचे हा मोठा प्रश्न पडतो.