रस्त्यात खड्डे नव्हे चक्क खड्ड्यात रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:43 PM2019-08-03T23:43:13+5:302019-08-03T23:43:40+5:30
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रविवारी गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोलीकडे मार्गक्र मण करणार आहे. कोहमारा-वडसा राज्यमहामार्गात रस्त्यात खड्डे नव्हे तर चक्क खड्ड्यातच रस्ते आहेत.याची प्रत्यक्ष अनुभूती येणार आहे.
संतोष बुकावन।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रविवारी गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोलीकडे मार्गक्र मण करणार आहे. कोहमारा-वडसा राज्यमहामार्गात रस्त्यात खड्डे नव्हे तर चक्क खड्ड्यातच रस्ते आहेत.याची प्रत्यक्ष अनुभूती येणार आहे. मात्र मुख्यमंत्री या राज्य महामार्गाने जाणार असल्याने स्थानिक सार्वजनिक बांधकाम उपविभागाने डागडुजी करण्यास प्रारंभ झाला आहे.
रविवारी अर्जुनी मोरगाव येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आहे. त्यानंतर महाजनादेश यात्रा गडचिरोली जिल्ह्यात वडसा-कोहमारा राज्यमार्गाने जाणार आहे. हा मार्ग अत्यंत दयनीय अवस्थेत आहे.येथे रस्त्यात खड्डे नाहीत तर खड्डयात रस्ते आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाचे पाणी खड्डयात साचलेले आहे. शिवाय येथून मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक सुरु असते.त्यामुळे आधीच जर्जर असलेले रस्ते आणखीच जर्जर होत चालले आहेत. या रस्त्याला केवळ न केवळ मुख्यमंत्री अथवा बांधकाम मंत्र्यांचीच प्रतीक्षा करीत असतात.
बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना जनता किंवा वाहतुकीशी सोयरसुतक नसते,हायवेट मंत्र्यांची चिंता असते. आता मुख्यमंत्री येणार त्यांना हेलकावे घ्यावे लागू नये म्हणून रस्ते सजू लागले आहेत.या रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरुवात झाली आहे. हेविवेट नेते या रस्त्याने जाणार तेव्हाच यंत्रणेला डागडुजी करण्याचे कसे सुचते. हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
दोन वर्षांपूर्वी या रस्त्याने बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात आगमन झाले होते.त्या वेळी सुद्धा रस्ते नववधू सारखे सजले होते.त्याची पुनरावृत्ती मुख्यमंत्र्याच्या यात्रेनिमित्त होतांना दिसून येत आहे. अशा हेविवेट नेत्यांनी सदैव या रस्त्याने यावे असे आमंत्रण येथील जनतेने दिले आहे.
रस्त्याची अवदशा कधी संपणार
राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील या मार्गाने गेले. रविवारी मुख्यमंत्री जाणार आहेत.पूर्व विदर्भाच्या नागपूरचे हेविवेट नेते नितीन गडकरी हे केंद्रात बांधकाम मंत्री आहेत. त्यांनी देशभरात रस्त्यांचे प्रचंड जाळे विणले. कोटयवधी रुपयांचा खर्च केला जात आहे.मात्र हा राज्य महामार्ग दुर्लक्षतिच आहे. ते मागील ५ वर्षांत या रस्त्याने कारने आले नाहीत, हवेतून आले. त्यामुळे त्यांची या रस्त्यावर दृष्टीच पडली नाही, अन्यथा हा रस्ता केव्हाच नव्याने तयार होऊन लोकसेवेसाठी तत्पर असता नागरिक बोलतात.
बांधकाम विभाग मोकळा
या मार्गावर येरंडी ते देऊळगाव फाटा तसेच आसोली ते वडसापर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.इटखेडा ते खामखुरा रस्त्यावरही ठीकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना वाहन कुठून हाकावे असा प्रश्न पडतो.खड्डयात पाणी साचलेले असल्याने खड्डा असल्याचे लक्षातच येत नाही. परिणामत: वाहन उसळून अनेक अपघात यापूर्वी घडले आहेत.जीवीतहानी सुध्दा झाली आहे. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी अद्यापही याची गंभीर नसल्याचे दिसून येते.