घरगुती गॅस ग्राहकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:28 AM2021-05-23T04:28:29+5:302021-05-23T04:28:29+5:30
सालेकसा : आमगाव येथून संचालित इण्डेन गॅस ग्राहकांना घरपोहोच गॅस हंडा उपलब्ध करून देण्याच्या नावावर भरमसाट वसुली करण्याचा प्रकार ...
सालेकसा : आमगाव येथून संचालित इण्डेन गॅस ग्राहकांना घरपोहोच गॅस हंडा उपलब्ध करून देण्याच्या नावावर भरमसाट वसुली करण्याचा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू आहे. या अवैध वसुलीवर आळा कोण घालणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
आमगाववरून गॅस हंडे घेऊन निघणारी गाडी सालेकसा मार्गावर जाताना जेमतेम ६-७ किमी. अंतरावरील गावात पोहोचताच गॅस हंडा देताना हंड्यातील मूळ रक्कम घेताना अतिरिक्त ३० ते ४० रुपये वसूल केले जातात. एका गाडीत शेकडो गॅस हंडे घेऊन जाणारी गाडी एका-एका ग्राहकाकडून ४० रुपयांपर्यंत वसूल करीत असेल, ज्याचा काही हिशेब नाही. ग्राहकांना त्याची पावती नाही. यात असे दिसून येते की, गॅस एजन्सीच्या मालकाने हंडा वाहून नेणाऱ्या गाडीचालकाला अवैध वसुलीची सूट देऊन ठेवली असावी. आश्चर्य असे की, ६-७ किमी. पर्यंत घरपोहोच सेवा देताना ४० रुपये अतिरिक्त आणि १५ किमीपर्यंत सेवा देतानासुद्धा ४० रुपये अतिरिक्त वसुल केले जातात. परंतु, याच्यात पोहोचविण्याच्या खर्चामध्ये तफावत असते. मग घरपोहोच सेवेचा मोबदलासुद्धा अंतराप्रमाणे असावा.
शनिवारी कावराबांध येथील एका ग्राहकाच्या घरी गॅस हंडा घरपोहोच देताना गॅसची किंमत ८९८ असताना त्या ग्राहकांकडून एकूण ९४० रुपये वसूल करून हंडा देण्यात आला. अर्थात एकूण ४२ रुपये जास्तीचे वसूल करण्यात आले. अशीच वसुली इतरही ग्राहकांकडून होत असेल तर एजन्सीचे मालक ग्राहकांची केवढी लूट करतात हे लक्षात येते. सरकार जेव्हा ग्राहकांसाठी प्रती सिलिंडर किंमत निर्धारित करते, तेव्हा एजन्सीचे कमिशन व घरपोहोच सेवेची रक्कमसुद्धा समाविष्ट असते. तरीसुद्धा अतिरिक्त वसुली का केली जाते. ही लूट थांबविण्यात यावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.