प्लास्टिक विरोधात जनजागृतीसाठी युवकाचे देशभर पायी भ्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 01:20 PM2021-12-01T13:20:36+5:302021-12-01T13:30:43+5:30
प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी कसा घातक आहे. त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागणार, भावी पिढीसाठी प्लास्टिकची समस्या किती गंभीर राहू शकते यावर जनजागृती करण्यासाठी तो देशभर पायी प्रवास करतोय.
राजकुमार भगत
गोंदिया : कामठीचा १९ वर्षाचा तरुण मागील वर्षापासून देशभ्रमणाला निघाला आणि ते सुद्धा पायी. ऐकून विश्वास बसणार नाही. मात्र, या तरुणाने आतापर्यंत १६ राज्यांचा प्रवाससुद्धा पूर्ण केला आहे. प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी कसा घातक आहे. त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागणार, भावी पिढीसाठी प्लास्टिकची समस्या किती गंभीर राहू शकते यावर जनजागृती करण्यासाठी तो देशभर पायी प्रवास करतोय. सोमवारी तो गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे पोहोचला. यावेळी त्याच्याशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधून त्याचा प्रवास उलगडला.
रोहन रमेश अग्रवाल हा कामठीचा राहणारा. वडील व्यावसायिक तर आई गृहिणी व त्याला एक लहान बहीण आहे. २५ ऑगस्ट २०२० रोजी तो बारावसी येथून गंगास्नान करून देशभ्रमण करण्यासाठी निघाला. १६ राज्यांचे भ्रमण करून तो सोमवारी सडक-अर्जुनी येथे आला असता सडक-अर्जुनी येथील महाराष्ट्र पत्रकार संघाचे त्यांचे स्वागत केले. रोहन अग्रवाल यांनी लोकमत प्रतिनिधीला माहिती दिली. त्यांच्या भ्रमणाला ४८० दिवस पूर्ण झाले आहे.
राेहनने आतापर्यंत उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिलनाडू, पाॅंडेचेरी, केरळ, कर्नाटक, गोवा आणि नागपूरवरून सडक-अर्जुनी असा २ हजार किलोमीटरचा प्रवास पायी तर २० हजार किलोमीटर कोणी लिप्ट देऊन वाहनातून प्रवास केला. बी.काॅम. द्वितीय वर्षाला शिकत असताना त्यांनी आपल्या देशभ्रमणाची बाब आई-वडिलांना सांगीतली. तेव्हा त्यांनी त्याला वेड्यात काढले. पण रोहनने आपल्या मनात खूणगाठ बांधली व घरून अडीच हजार रुपये घेऊन देशभ्रमण करण्यासाठी निघाला.
रोहन सांगतो, देशात अजूनही खूप माणुसकी शिल्लक आहे. अन्यथा माझे भ्रमण थांबले असते, अनेक लोक भेटतात. कोणी लिफ्ट देतो, कोणी सहकार्य करतो अन्यथा माझ्याजवळ काही नाही. त्यांनी आपला आजचा मुक्काम सुधीर अग्रवाल यांच्याकडे केला. अनेक सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी त्यांच्या भेटी घेतल्या. तसेच येथून आता रशियामधील सायबेरिया येथे जाण्याचा मानस त्याने व्यक्त केला.
माणुसकीचा धर्म निर्माण व्हावा
विशेषत: प्लास्टिक विरोधात व प्रदूषणाबाबत जनजागृती करायची हे ठरविले असल्याने त्यांनी प्लास्टिक प्रदूषणाबाबत बरीच माहिती सांगितली. तो अनेक ठिकाणी प्लास्टिक विरोधात मार्गदर्शन ही करतो. समाजात माणुसकीचा धर्म निर्माण व्हावा व सुख, समृद्धी व शांतता नांदावी असे त्यांना वाटते.
भारत देशात विविध धर्म, अनेक जाती, अनेक प्रथा, परंपरा, संस्कृती, भाषा भौगोलिक ठिकाणेे तसेच वेशभूषा, विचार आहेत. भ्रमण केल्याने या सर्वांचे ज्ञान प्राप्त होते. प्रवासाने प्रत्यक्षवादी जीवनाचा अनुभव येतो व नवीन प्रकारचे शिक्षणही मिळते.
- रोहन अग्रवाल