पावसाच्या हजेरीने रोवणीला आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 09:48 PM2018-07-15T21:48:53+5:302018-07-15T21:50:26+5:30
यंदा उशिरा पेरण्या आणि इतर कामे मागे पडल्याने रोवणी सुद्धा लांबणीवर गेलेली आहे. परंतु आता नुकताच पाऊस सरासरी पडत असून नर्सरी सुद्धा रोवणी योग्य झाल्याने आता सर्वत्र रोवणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : यंदा उशिरा पेरण्या आणि इतर कामे मागे पडल्याने रोवणी सुद्धा लांबणीवर गेलेली आहे. परंतु आता नुकताच पाऊस सरासरी पडत असून नर्सरी सुद्धा रोवणी योग्य झाल्याने आता सर्वत्र रोवणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या भाकीतानुसार यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतीची कामे वेळेवर करण्यासाठी सजगता दर्शविली. परंतु मृग आणि आर्द्रनक्षत्र कोरडा गेल्याने अनेक शेतकरी चिंतेत पडले होते. दरम्यान, मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी यंदा उशिरा पेरण्या केल्या होत्या. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून पाऊस पडत असला तरी नर्सरी रोवणी योग्य झाली नव्हती. तसेच शेतात पाण्याचा संग्रह सुद्धा होत नव्हता.
यामुळे सर्वत्र रोवणीची कामे लांबणीवर गेलेली होती. परंतु आता नर्सरी वाढली असून शेतात योग्य प्रमाणात पाणी साचू लागले आहे. त्यामुळे वरथेंबी पाण्यावर अवलंबीत शेतकºयांनी रोवणीला सुरुवात केली आहे. परंतु यापुढे पाऊस येत राहिला तरच रोवण्या चालू राहतील. अन्यथा पावसाने दडी मारल्यास रोवणीची कामे खोळंबण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंपधारकांनी मारली बाजी
शेतात स्वत:ची बोअरवेल आणि पंपची सोय असलेल्या शेतकºयांनी मागील फरकाचा पुरेपूर लाभ घेत आपली रोवणी आटोपण्याच्या मार्गावर आणली आहे. खासगी पंप धारकांनी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच धान रोवणी केली होती. त्यामुळे जून महिन्याच्या शेवटपर्यंत त्यांची नर्सरी रोवणी योग्य झाली आणि मध्यम पडणारा थोडाफार पाऊस जमीनीच्या मशागतीसाठी उपयोगी पडला. त्यामुळे जून महिन्याच्या उत्तरार्ध आणि जुलैन्या सुरुवातीला पंप धारकांनी बोअरवेलच्या पाण्याच्या मदतीने रोवणीच्या कामाला सुरुवात केली. अशात त्यांना मजूर सुद्धा पुरेसा प्रमाणात उपलब्ध झाले. या संधीचा लाभ घेत जवळपास सर्वच बोअरवेल धारकांनी आपली रोवणी जुलैच्या दुसºया आठवड्यापर्यंत पूर्ण केलेली दिसत आहे. मात्र आता वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतातील रोवणी बाकी असून नियमित पाऊस आल्यास सर्वांंची रोवणी योग्य वेळेवर होऊ शकेल. सध्या पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. पुढे अशीच अपेक्षा शेतकरी करीत आहेत.