जनजागृतीत प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 06:00 AM2019-09-09T06:00:00+5:302019-09-09T06:00:08+5:30
प्रसार माध्यमांसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रत्यक्ष तपासणी प्रशिक्षण शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी माहिती देतांना त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले की, येत्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार ईव्हीएम-व्हीव्हीपॅट कार्यप्रणालीची माहिती जनसामान्यपर्यंत पोहचिवण्याचे कार्य प्रसार माध्यम उत्तमपणे करीत आहे. ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची प्रसिध्दी व्यापक प्रमाणात होत असली तरी प्रसार माध्यमांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट संदर्भात माहिती होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
प्रसार माध्यमांसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रत्यक्ष तपासणी प्रशिक्षण शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी माहिती देतांना त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले की, येत्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण १२८१ मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. १ मतदान केंद्राची पूर्व परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा ११६०० महिला आणि ८९०४ पुरूष नवमतदारांची नोंदणी झाली आहे. १८ ते १९ वर्ष वयोगटातील नव मतदारांची नोंदणी मागील निवडणुकीत १.०९ टक्के होती. यात वाढ झाली असून ती आता १.७१ टक्के झाली आहे.लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत १० लक्ष २३ हजार ८६५ मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहे. तर विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन मतदार यादीनुसार १० लाख ९६ हजार ४४१ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. तर १७९२ सर्व्हिस मतदार मतदानाचा हक्क बजाविणार असल्याचे सांगितले. या वेळी सदर कार्यक्र मात प्रामुख्याने उपजिल्हाधिकारी निवडणूक सुभाष चौधरी, सहायक अधीक्षक निवडणूक हरीशचंद्र मडावी, अ.का.नोखलाल कटरे, कनिष्ठ प्रोग्रामर प्रविण गडे, प्रणय तांबे कनिष्ठ अभियंता आणि निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.
राजकीय पक्षांनी निवडणूक जनजागृती करावी
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेत राजकीय पक्षांनी सक्रीय सहभाग नोंदवून सर्व सामान्यपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहचवावी असे आवाहन जिल्हाधिकारी सर्व राजकीय पक्षांना केले आहे. सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याची विशेष मोहिम गाव पातळीवर सुरु आहे. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट विषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचिवण्यासाठी राजकीय पक्षांची मोलाची भूमिका असल्याचे जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
महिला व दिव्यांगासाठी बुथ
विधानसभा निवडणुकीसाठी या महिला मतदार केंद्राशिवाय १ दिव्यांग मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या मतदान केंद्राचे संचालन दिव्यांग अधिकारी व कर्मचारी करतील याप्रमाणे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकुण ३३७६ मतदारांची दिव्यांग मतदार म्हणून नोंदणी झाली आहे. मतदान केंद्रांवर त्यांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येईल असे जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
व्हीव्हीपॅट, कॅन्ट्रोल युनिटचे प्रात्यक्षिक
कॅन्ट्रोल युनिट,बॅलेट युनिट, तथा व्हीव्हीपॅटच्या कार्यप्रणाली संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थितांनी प्रत्यक्ष मतदान करुन कंट्रोल युनिटची संपूर्ण कार्यप्रणालीचा अनुभव घेतला.मतदान प्रक्रि या, मतचाचणी प्रक्रि या, मतमोजणी प्रक्रि या करण्यात आली.ज्यांना मतदान करण्यात आले होते त्यांनाच मतदान झाले की नाही याबाबत खात्री पटवून देण्यात आली.
९७ टक्के मतदारांचे फोटो उपलब्ध
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ९६.५९ टक्के मतदारांना मतदार ओळखपत्र वितरीत करण्यात आले आहे. यापैकी ९६.६५ टक्के मतदारांचे मतदार यादीत फोटो उपलब्ध आहेत.तसेच विधानसभा निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.