पावसाअभावी रोवणीला पडल्या भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:56 AM2018-10-06T00:56:49+5:302018-10-06T00:57:25+5:30
मागील पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणी झालेल्या शेतीला भेगा पडल्या आहेत. तर पावसाअभावी धान करपण्याच्या मार्गावर आहे. १४ आॅगस्टला झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : मागील पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणी झालेल्या शेतीला भेगा पडल्या आहेत. तर पावसाअभावी धान करपण्याच्या मार्गावर आहे. १४ आॅगस्टला झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आता धान भरण्याच्या स्थितीत असताना पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी संकटात आले आहेत.
जिल्ह्यातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी,धानोरी, बेहळीटोला, थाडेझरी, बोळुंदा, मुरपार, लेंडेझरी, चिचटोला, मुंडीपार या गावातील शेतकरी मागील पंधरा दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. कोसमतोंडी, धानोरी, बोळुंदा, थाडेझरी, बेहळीटोला येथे मागील वर्षीसुद्धा दुष्काळी परिस्थिती होती. या गावातील शेतकऱ्यांनी ८० टक्के धानाची रोवणी केली नव्हती. मात्र या शेतकऱ्यांना शासनाने कुठलीच नुकसान भरपाई दिली नाही.
यावर्षी या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने धानाची रोवणी केली. मात्र पावसाने पुन्हा दगा दिल्याने मागील वर्षी सारखेच यावर्षी पुन्हा दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार नाही ना, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित आहे. सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांसह कोरडवाहू शेतकऱ्यांनी रोवणीची कामे लगबगीने पूर्ण केली.
सुरूवातीला झालेल्या संततधार पावसामुळे शेतकरी सुखावले होते. लवकर धानाचे पीक जोमदार यावे, यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खताचे डोजही दिले. परंतु मागील पंधरा दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने धानपिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
वाढत्या तापमानामुळे धानाच्या बांध्या कोरड्या पडत असून धान वाळत असल्याचे चित्र आहे. शेतातील रोवणीला भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे येत्या आठ दहा दिवसात पाऊस न झाल्यास दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सिंचन प्रकल्पांवर भिस्त
सध्या हलके धान निघण्याच्या मार्गावर आहे तर जड धानाला एका पाण्याची गरज आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे. ते शेतकरी धानाला पाणी देत आहे. तर धानपिके संकटात आल्याचे पाहून सिंचन प्रकल्पातील पाणी सोडले जात आहे. मात्र शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याची ओरड आहे. तर काही शेतकऱ्यांची भिस्त पूर्णपणे या सिंचन प्रकल्पांवर असल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांची दिशाभूल
मागील वर्षी कोसमतोंडी, धानोरी, बोळुंदा, थाडेझरी, बेहळीटोला या पाच गावात ८० टक्के धानाची रोवणी पावसाअभावी झाली नव्हती. या गावातील शेतकऱ्यांनी अनेकदा तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर या पाच गावातील सर्वे करण्याचे निर्देश तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना देण्यात आले. मात्र तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी शेतीचे पंचनामे शेतशिवारात जाऊन न करता टेबलावर बसून सर्वे करुन शासनाकडे पाठविले. यामध्ये शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून शेतकरी वंचित राहिले.
कर्मचाऱ्यांवर कारवाहीची मागणी
महसूल आणि कृषी विभागाच्या चुकीच्या अहवालामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील अनेक शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.