सडलेल्या धानामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:32 AM2021-08-12T04:32:47+5:302021-08-12T04:32:47+5:30
देवरी : खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये डवकी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत खरेदी केलेेले अंदाजे एक हजार क्विंटल ...
देवरी : खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये डवकी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत खरेदी केलेेले अंदाजे एक हजार क्विंटल धान उघड्यावर ठेवले होते. हे उघड्यावर ठेवलेले धान देवरी येथील आदिवासी विकास महामंडळाने उचल न केल्याने पावसात पाण्यात भिजून सडले आहे. या सडलेल्या धानाची दुर्गंधी येत आहे. यामुळे शालेय विद्यार्थी आणि गावकऱ्यांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे सडलेल्या धानाची त्वरित उचल करण्याची मागणी सिद्धार्थ विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र मेश्राम व गावकऱ्यांनी केली आहे.
खरीप हंगाम २०२०-२१ या वर्षात शासनाच्या आदेशाप्रमाणे आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत येणाऱ्या सर्व आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करून धान खरेदी केली. धान पावसाळ्यापूर्वी आदिवासी विकास महामंडळाने उचल करणे गरजेचे होते. परंतु धानाची उचल न केल्याने खरेदी संस्थेने या धानावर ताडपत्री बांधून ठेवली. पावसाळ्यातील पाण्यात हे सर्व धान ओले झाले. त्यामुळे हे धान सडू लागले. आता या सडलेल्या धान्यापासून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. डवकी केंद्रात ठेवलेले धान सडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. यामुळे बाजूला असलेले विद्यालय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे शासन कोरोना संसर्गामुळे गाव व शहर परिसर स्वच्छ ठेवून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान करते तर दुसरीकडे आदिवासी विकास महामंडळाच्या दिरंगाईमुळे या केंद्रातील धानाची उचल न केल्याने सर्व धान सडले. तरी हे सडलेले सर्व धान डवकी केंद्रातून इतरत्र हटविण्याची मागणी येथील आदिवासी सहसंस्थेच्या संचालक मंडळात दिले. शिष्टमडळात डवकी येथील सिद्धार्थ विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र मेश्राम, सरपंच उमराव बावणकर, उपसरपंच गोपाल परसगाये, गजानन बावनकर, शकील शेख, दिनेश फरदे, विलास फरदे, रामचंद्र परसगाये यांचा समावेश होता.
......