विद्युततारा कोलमडल्याने रोवणी खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:55 AM2017-07-18T00:55:11+5:302017-07-18T00:55:11+5:30
गेल्या १५ दिवसांपासून खापरी परिसरात विद्युततारा शेतात कोलमडल्याने शेतकरी भीतीपोटी रोवणी करण्यास विलंब करीत आहेत.
१५ दिवस लोटले : वीज वितरण महामंडळाचा अक्षम्य दुर्लक्षितपणा
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : गेल्या १५ दिवसांपासून खापरी परिसरात विद्युततारा शेतात कोलमडल्याने शेतकरी भीतीपोटी रोवणी करण्यास विलंब करीत आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळवूनही ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
खापरी परिसरात गेल्या १५ दिवसांपूर्वी विद्युत खांब तुटल्याने विद्युततारा शेतात लोंबकळत आहेत. काही तारा शेतातच पसरल्या आहेत. ज्यावेळी विद्युततारा लोंबकळल्या तेव्हा तातडीने वीजपुरवठा खंडीत केल्याने अनर्थ टळला. ही बाब वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती असूनही ते याकडे कानाडोळा करीत आहेत.
अर्जुनी-मोरगाव ते खापरी या रस्त्यावर सुध्दा तारा तुटून पसरल्या आहेत. याच रस्त्याने परिसरातील शेतकरी दैनंदिन ये-जा करतात. विद्युत तारांमध्ये प्रवाह नसला तरी शेतकऱ्यांमध्ये भीती कायम आहे. सध्या रोवणीचा हंगाम सुरु आहे. शेतमालक व मजूरवर्गामध्ये या तारांची भीती असल्याने रोवणीची कामे खोळंबली आहेत.
सध्या पावसाने डोळे वटारले. त्यामुळे मोटरपंपावर आधारित असलेले शेतकरी विद्युत प्रवाह बंद असल्याने रोवणीपासून वंचित आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करुन वीजप्रवाह नियमित सुरु करावा, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.