रोवा वं बाई रोवणी रोवा.. संध्याकाळी पाटलाघरच्या घुगऱ्या खावा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:30 AM2021-07-27T04:30:22+5:302021-07-27T04:30:22+5:30
मुन्नाभाई नंदागवळी बाराभाटी : रोवणी करणे म्हणजे शेतकरी वर्गाचा एक सण असतो. कारण रोवणी करताना धुरे-पारा मारणे, कोंटे काढणे, ...
मुन्नाभाई नंदागवळी
बाराभाटी : रोवणी करणे म्हणजे शेतकरी वर्गाचा एक सण असतो. कारण रोवणी करताना धुरे-पारा मारणे, कोंटे काढणे, पुरुषांचे काम पऱ्हे काढणे, रोवणीच्या बांधीत नांगर व ट्रॅक्टरच्या सहायाने चिखल करणे तरच रोवणीची तयारी पूर्ण होते. अनेक भागातील महिला आजही रोवणीची लोकगीते म्हणत रोवणीला बहर चढवतात. परिसरात आजही ती परंपरा कायम असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वीच्या काळात आणि आताच्या काळात फार तफावत दिसते, पण शेती करताना मात्र परंपरा न विसरता लोककला जोपासत आजही कथा, गीत व चुटकुले सादर करून मोठ्या आनंदाने रोवणी बहरली आहे. रोवणी करणे म्हणजे शेतकरी वर्गाचा एक सण असतो, कारण रोवणी करताना धुरे-पारा मारणे, कोंटे काढणे, पुरुषांचे काम प-हे काढणे, रोवणीच्या बांधीत नांगर व ट्रॅक्टरच्या सहायाने चिखल करणे तरच रोवणीची तयारी पूर्ण होते. मग जुन्या पिढीच्या वयस्क स्त्रिया गाण्याच्या तालावर, रोमांचकारी राजा-राणीच्या पौराणिक, सामाजिक कथेच्या मांडणीद्वारे, हास्याचा कल्लोळ करणारे चुटकुले सादर करीत असल्याने रोवणीला बळ मिळते व रोवणीचा वेग वाढतो. ‘रोवा व बाई रोवणा रोवा, संध्याकाळी पाटलाच्या घरच्या घुगऱ्या खावा...’ अशी झाडीपट्टीतील रोवणीची गाणी प्रसिद्ध आहेत. सर्वच स्त्रिया एका सरळ रेषेत उभ्या राहून रोवणीला सुरुवात करतात. रोवणी हा आनंदाचा सोहळा मजूर शेतात फुलवतात. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण अनेक अडचणी, समस्यांचा सामना करत आपले शेत राखतो. शेतात धानपीक लावतो अशातच रोवणीची मजा काही वेगळीच असते व अनुभवणाऱ्यांना तर न्यारीच. रोवणीत वणकर, फणकर, नांगऱ्या यांचे संगनमत साधून रोवण्या बहारदार करतात. अशा प्रकारे आजही लोककला परंपरागत रोवणी परिसरातील येरंडी, बाराभाटी, बोळदे, कवठा, डोंगरगाव, देवलगाव, सुकळी आदी गावात बहरल्याचे चित्र पाहावयास मिळते.
--------------------------
भिंतीवर चित्र काढून रोवणीची सांगता
शेवटच्या दिवशी रोवणी संपली की परंपरेने चिखल-मातीचा खेळ खेळून मजूर रोवणीची पूजा करतात. डफळीचा बाजा करून शेतातून रॅली काढतात व घरापर्यंत बैलांच्या जोडीला समोर करून मागे-मागे मजूर गाणी म्हणत येतात. शेतकरी घरी आल्यावर भिंतीवर चिखलाने माणसांचे चित्र काढतात ही ओळख असते रोवणी संपूर्ण झाल्याची. परिसरातील शेतकऱ्यांनी आजही ही परंपरा कायम ठेवली असून पारंपरिक पद्धतीने रोवणी आटोपली जात आहे.