तुडतुडाच्या व्यवस्थापनाकरिता पट्टा पद्धतीने रोवणी गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:35 AM2021-07-07T04:35:32+5:302021-07-07T04:35:32+5:30
सौंदड : खरीप हंगामात भात पिकावर होणारा किडी व रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेता, त्यांचे व्यवस्थापन योग्य रीतीने होण्याकरिता ...
सौंदड : खरीप हंगामात भात पिकावर होणारा किडी व रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेता, त्यांचे व्यवस्थापन योग्य रीतीने होण्याकरिता शेतकऱ्यांनी धान लागवड करताना पट्टा पद्धतीचा अवलंब करावा, अशा सूचना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आल्या आहे.
यांतर्गत, भात पिकाची रोवणी करताना जपानी पद्धत, श्री पद्धत, पारंपरिक पद्धत इत्यादी पद्धतींचा शेतकरी अवलंब करतात. रोवणी कोणत्याही पद्धतीने केली जात असली तरीही दर २ ते ३ मीटर अंतरावर चालण्याकरिता १ फूट रुंदीचा रस्ता सोडावा. पारंपरिक पद्धतीमध्ये हुंडा पद्धतीने रोवणी झालेली असल्यास २ ते ३ दिवसांच्या आतच दर २ ते ३ मीटर अंतरावर दुहेरी दोरी लावून त्यामधील रोपे उपटून १ फुटाचा रस्ता तयार करावा. पट्टा पद्धतीच्या लागवडीमुळे होणारे पिकामध्ये कीड व रोग नियंत्रण याकरिता औषध फवारणीचे काम सुलभतेने करता येते. मुख्यत्वेकरून तुडतुड्याचे प्रभावी व्यवस्थापन करता येते. पिकामध्ये रोग किडीचा प्रादुर्भाव व पिकाची न्याहाळणी करण्याकरिता १ फुटाच्या रस्त्याचा उपयोग होतो. पिकामध्ये सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे प्रमाण चांगले असल्यामुळे किडी व रोगांचे प्रमाण कमी राहते. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पट्टा पद्धतीचा अवलंब करावा, असे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.