कोरोना काळातील प्रोत्साहन भत्त्यापोटी एसटी चालकांना दिले २३ हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:30 AM2021-03-16T04:30:24+5:302021-03-16T04:30:24+5:30
गोंदिया : बाहेरगावी कामावर असताना लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी सोडून देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष बसेस ...
गोंदिया : बाहेरगावी कामावर असताना लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी सोडून देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष बसेस चालविल्या होत्या. या बसेसद्वारे परराज्यातील नागरिकांना सोडण्यासाठी फेऱ्या मारणाऱ्या चालक-वाहकांना शासनाने प्रतिदिवस ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता घोषित केला होता. याअंतर्गत, गोंदिया आगारातून २८ विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या बसेसने लगतच्या छत्तीसगड राज्यातील डोंगरगड, रायपूर, कबीरधाम, मध्य प्रदेश राज्यातील रायसेन, तर कर्नाटक राज्यातील नागरिकांना सोडले होते. यासाठी २५ चालकांनी आपली सेवा दिली होती. आगाराकडून या २५ चालकांना प्रोत्साहन भत्ता पोटी २२ हजार ८०० रुपये देण्यात आले आहे. कोरोनाचा उद्रेक झाला असतानाही मागील वर्षी नागरिकांनी आपल्या घरी जाण्यासाठी पायी-पायीच वाट धरली होती. मात्र, अशात शासनाकडून त्यांना त्यांच्या गंतव्यापर्यंत सोडण्यासाठी एसटीची मदत घेतली होती.
-----------------------------
आगारातील पाच कर्मचारी पॉझिटिव्ह
कोरोनामुळे गोंदिया आगारातील पाच कर्मचारी बाधित झाले आहेत. यामध्ये दोन चालक, दोन वाहक, तर एक वाहतूक नियंत्रक आहे. मागील वर्षी कोरोनाचा उद्रेक झाला असताना त्या काळातही या कर्मचाऱ्यांनी आपली सेवा दिली होती. त्यातच कोरोनामुळे ते बाधित झाले होते.
-------------------------
- कोरोनाकाळात आपल्या जिल्ह्यातून परराज्यात एसटीच्या फेऱ्या झाल्या - २८
- चालकांनी दिली कोरोनाकाळात सेवा - २५
- वाहकांनी दिली कोरोनाकाळात सेवा - ००
-----------------------------
कोट
कोरोनाचा उद्रेक असतानाही राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सेवा दिली. अशात परराज्यांत बसेस घेऊन गेलेल्या चालक-वाहकांसाठी शासनाने ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला होता. त्यानुसार परराज्यात बसेस घेऊन गेलेल्या २५ चालकांना २२ हजार ८०० रुपये देण्यात आले आहेत.
- संजना पटले
आगार प्रमुख, गोंदिया.
-----------------------------
कोट
कोरोना काळात आगारातील चालकांनी परराज्यातील नागरिकांना सोडण्यासाठी बसेस नेल्या होत्या. याबद्दल त्यांना घोषित करण्यात आलेला भत्ता उशिरा मात्र मिळाला आहे.
- शाहीद शेख
अध्यक्ष, एसटी कामगार संघटना.