तेंदूपत्त्यातून ३४.३२ कोटींची रॉयल्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2017 01:52 AM2017-02-15T01:52:03+5:302017-02-15T01:52:03+5:30

सन २०१७ मध्ये गोंदिया वन विभागातील संपूर्ण १२ परिक्षेत्रातील २९ समूह घटकांच्या एकूण ६२ तेंदूपानांच्या घटकांसाठी तेंदूपाने संकलनाचे काम सुरळीतपणे

Rs. 34.32 crores royalties from LeT | तेंदूपत्त्यातून ३४.३२ कोटींची रॉयल्टी

तेंदूपत्त्यातून ३४.३२ कोटींची रॉयल्टी

Next

२०१७ चा हंगाम : ४० हजार ५९५ प्रमाण गोणींचे घोषित उत्पादन
देवानंद शहारे  गोंदिया
सन २०१७ मध्ये गोंदिया वन विभागातील संपूर्ण १२ परिक्षेत्रातील २९ समूह घटकांच्या एकूण ६२ तेंदूपानांच्या घटकांसाठी तेंदूपाने संकलनाचे काम सुरळीतपणे करण्यासाठी शासनाद्वारे परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सन २०१७ च्या यावर्षीच्या तेंदू हंगामासाठी ४० हजार ५९५ प्रमाण गोणींचे उद्दिष्ट असून, ही उद्दिष्टपूर्ती झाल्यास ३४ कोटी ३२ लाख ९१ हजार ८७२ रूपयांचा महसूल प्राप्त होणार आहे.
जिल्ह्यात तेंदूपाने संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात होते. तेंदूपाने संकलन करणाऱ्या मजुरांच्या कामावर गदा येवू नये यासाठी शासनसुद्धा प्रयत्नशील असते. जंगलात वनवा लागू नये, तेंदूपाने नष्ट होवू नये यासाठी वन विभागाकडून जनजागृती अभियान राबविण्यात येते. यावर्षीसुद्धा गोंदिया, गोरेगाव, सालेकसा, तिरोडा, कोसमतोंडी, सडक-अर्जुनी, कोहमारा, सौंदड, शेरपार, देवरी, भागी-मुल्ला, नवेगावबांध, अर्जुनी-मोरगाव, चिचगड अशा एकूण २९ बिटमध्ये तेंदूपत्ता संकलनाची कामे केली जाणार आहेत.
तेंदूपाने संकलन करणे, पुडे सुकविणे, पाणी शिंपणे, बोद भराई करणे आदी संपूर्ण कामासाठी मजुरांना मजुरी परवाना धारकांच्यामार्फत वितरित करण्यात येते. त्यामुळे मजूर कुटुंबांना उन्हाळ्यात एक मोठा आर्थिक आधार प्राप्त होतो. तेंदूपाने घटक विक्रीपासून मिळालेल्या महसुलातून शासकीय खर्च वजा करून शासनातर्फे मजुरांना शिल्लक रक्कम बोनस स्वरूपात वितरित करण्याचेही धोरण आहे.
मागील वर्षी, सन २०१६ तेंदूपाने हंगामात तेंदूपाने संकलनाचे काम गोंदिया विभागातील क्षेत्रीय कर्मचारी व परवानाधारक यांनी त्यांच्या स्तरावर संकलनाच्या कामाचे केलेल्या उत्तम नियोजनामुळे उत्कृष्टपणे झाले. तसेच त्यावर्षी गोंदिया वन विभागासाठी नेमून दिलेल्या उद्दिष्टाच्या जवळपास पूर्तता झाली. उद्दिष्ट होते १२.७८ कोटींचे व प्रत्यक्ष झाले १२.६२ कोटींचे. विशेष म्हणजे तेंदूपाने संकलन कामामुळे ४० हजारांच्या वर मजुरांना उन्हाळ्याच्या कालावधीत रोजगार प्राप्त झाला होता. सदर हंगाम २५ एप्रिलपासून सुरू करण्याचे आदेश निघाले होते. मात्र अनेक बिटमध्ये प्रत्यक्ष ३० एप्रिल व २ मेपासून तेंदूपाने तोडणीला सुरूवात झाली होती. तो हंगात ५ जूनपर्यंत सुरू होता.
आता यावर्षी सन २०१७ चा तेंदू हंगामसुद्धा एप्रिल महिन्याच्या शेवटी सुरू होण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. काही मजुरांची बँकेत खाती नसतात. त्यामुळे त्यांचे बोनस उर्वरित राहते. तरी मजुरांनी आपल्या नावे बँक खाते उघडावे व त्याबाबत माहिती परिक्षेत्र कार्यालयात द्यावी, असे आवाहन गोंदिया वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

२०१७ च्या हंगामात सर्वाधिक रॉयल्टी
तेंदू हंगामाबाबत मागील चार वर्षांच्या रॉयल्टीवर नजर घातली असता यावर्षीच्या हंगामात सर्वाधित रॉयल्टी मिळेल. सन २०१३ मध्ये सहा कोटी १७ लाख ४९ हजार ७६६ रूपये रॉयल्टी, सन २०१४ मध्ये सहा कोटी ७८ लाख ५२ हजार १७६ रूपये रॉयल्टी, सन २०१५ मध्ये नऊ कोटी २३ लाख ३७ हजार ७८२ रूपयांची रॉयल्टी व मागील वर्षी सन २०१६ च्या तेंदू हंगामात एकूण १२ कोटी ६२ लाख २० हजार ८५२ रूपयांची रॉयल्टी उपलब्ध झाली होती. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास तिप्पट रॉयल्टी यावर्षी सन २०१७ च्या हंगामात मिळणार आहे. ही रॉयल्टी रक्कम ३४ कोटी ३२ लाख ९१ हजार ८७२ एवढी आहे.

उद्दिष्टपूर्तीच्या जवळपास मजल
तेंदूपत्ता संकलनासाठी सन २०१५ च्या हंगामात ४६ हजार प्रमाण गोणींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र त्या हंगामात ४० हजार ९३६ प्रमाण गोणी झाल्याने ८८ टक्केच उद्दिष्टपूर्ती झाली होती. त्याद्वारे शासनाला ९ कोटी २३ लाख ३६ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. मागील वर्षी सन २०१६ मध्ये तेंदूपाने संकलनापेक्षा मजुरांनी रोजगार हमीच्या कामांना अधिक पसंती दिली होती. तरीसुद्धा १२.७८ कोटींचे उद्दिष्ट असताना १२.६२ कोटींचा महसूल उपलब्ध झाला.

 

Web Title: Rs. 34.32 crores royalties from LeT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.