हेक्टरी ४० हजार नुकसानभरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:44 PM2018-03-05T23:44:57+5:302018-03-05T23:44:57+5:30
आॅनलाईन लोकमत
सुकडी (डाकराम) : सतत तीन दिवस आलेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झाले. मात्र आतापर्यंत शासनाने नुकसान भरपाई दिली नाही. येत्या आठवडाभरात ही नुकसानभरपाई देण्यात यावी. या विरोधात छेडण्याचा इशारा तालुका काँग्रेस अनुसूचितीत जाती विभागाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला.
जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, सडक-अर्जुनी, मोरगाव-अर्जुनी, आमगाव, देवरी, सालेकसा व गोंदिया या आठही तालुक्यांमध्ये सतत १२, १३ व १४ फेब्रुवारीला जोरदार वादळीवारा व गारपिटीसह पाऊस झाला. त्यामुळे हरभरा, गहू, भाजीपाला, लाखोळी, जवस, आंब्याचा मोहोर व वटाणा आदी पीक पूर्णत: नष्ट झाले. मात्र आतापर्यंत शासनाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना कुठलीच आर्थिक मदत दिली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.
या वर्षी जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ असल्यामुळे धानाचे उत्पादन अत्यल्प प्रमाणात झाले. मावा तुळतुळा कीड व रोगांनी धानपीक पूर्ण नष्ट झाले. शेतकऱ्यांनी हिंमत न सोडता उसणे व कर्ज घेवून हरभरा, गहू, भाजीपाला, लाखोळी, जवस, वटाणा आदींचे बियाणे खरेदी करून शेतात लागवड केली. ते पीक शेतकºयांच्या शेतात डोलू लागले.
दुष्काळी परिस्थितीमुळे या पिकांनी आपली उपजीविका चालेल, अशी शेतकऱ्यांची आशा होती. पण निसर्गाच्या कोपामुळे १२, १३ व १४ फेब्रुवारीला संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, वारा, वादळ व गारपिट झाली. त्यात संपूर्ण पीक नष्ट झाले. त्यामुळे शेतकºयांवर पुन्हा संकट आले. वादळी पावसामुळे शेतकºयांच्या तोंडचा घास हिरावला गेला. परिणामी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी व हवालदिल झाला आहे.
शासनाने हरभरा, गहू, भाजीपाला, संत्रे, केळी, आंबा, लिंबू, मोसंबी, द्राक्षे या सर्व पिकांना कोणताही भेदभाव न करता हेक्टरी ४० हजार रूपयांची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी. शासनाने हेक्टरी जिरायत पिके सहा हजार ८०० रूपये, बागायती पिके १३ हजार ५०० रूपये, विमाधारक पिके (मोसंबी, संत्रा) २३ हजार ३०० रूपये, केळी ४० हजार रूपये, आंबा ३६ हजार ७०० रूपये, लिंबू २० हजार रूपये अशी तुटपुंजी आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांमध्ये भेदभाव केला आहे.
जिरायती व बागायती पिकांमध्ये भेदभाव न करता सारखी मदत द्यावी. महागाईमुळे बियाणे खरेदी करून लागवड खर्च बागायती पिके व जिरायती पिके यांना समतोल खर्च लागतो. या दोन्ही प्रकारच्या पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कोणताच भेदभाव न करता शासनाने गारपीटग्रस्त शेतकºयांना सरसकट हेक्टरी ४० हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी.
तसेच कौलारू घरे, सिमेंट सीट घरे, गवताची घरे यांचेझालेले नुकसान शासनाने २० हजार रूपये प्रति कुटुंब आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तिरोडा तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या शिष्टमंडळाने केली आहे. तसेच एका आठवड्यात नुकसानभरपाई न दिल्यास हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आदी मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. शिष्टमंडळात काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा सेवा सहकारी संघटनेचे अध्यक्ष शिशुपाल पटले, विलास मेश्राम, मिस्रीलाल शेंडे, किशोर कोटांगले, सतेंद्र साखरे, राजेश मेश्राम, झनेश्वरी वासनिक, शुभलक्ष्मी शामकुवर, भाऊराव कोटांगले, लालाजी गजभिये, रंजित वासनिक, दुर्गाप्रसाद जांभूळकर, अजय चंद्रिकापुरे, महेंद्र टेंभेकर, मुनिराज शहारे, अनिल शेंडे, राजेंद्र शेंडे, संजय वाघमारे, छाया रंगारी, विलास शामकुवर, प्रमिला टेंभेकर, राजू गजभिये, ईश्वर कटरे, नितानंद वासनिक, हितेश पटले आदी उपस्थित होते.