पं.स.च्या लिपिकाने केली ६३.३८ लाखांची अफरातफर
By Admin | Published: February 25, 2016 01:41 AM2016-02-25T01:41:50+5:302016-02-25T01:41:50+5:30
सडक-अर्जुनी पंचायत समितीमधील शिक्षण विभागाच्या कनिष्ठ लिपिकाने १७ जानेवारी २०१२ ते ८ जानेवारी २०१६ या काळात ....
चौकशी सुरू : सडक अर्जुनीतील प्रकार
सडक अर्जुनी : सडक-अर्जुनी पंचायत समितीमधील शिक्षण विभागाच्या कनिष्ठ लिपिकाने १७ जानेवारी २०१२ ते ८ जानेवारी २०१६ या काळात ६३ लाख ३८ हजार ७३२ रूपयांची अफरातफर केल्याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
गोंदिया तालुक्याच्या चारगाव (रावणवाडी) येथील सुनील गोंदुलाल पटले (४०) असे त्या लिपिकाचे नाव आहे. पटले सडक-अर्जुनी येथील पंचायत समितीत कनिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहे. त्याने सडक-अर्जुनी येथील गटशिक्षणाधिकारी यांच्या वेगवेगळ्या तीन खात्यातील ६३ लाख ३८ हजार ७३२ रूपये काढून त्यांची अफरातफर केली. २०१२-१३ मध्ये गटशिक्षणाधिकारी सोयाम होते. त्यानंतर खोब्रागडेंकडे चार्ज होता आणि सध्या मोरेश्वर मेश्राम हे गटशिक्षणाधिकारी आहेत.
खाते क्र.२०३/६० यामधून ४७ लाख ३३ हजार ७४५ रूपये, खंडविकास अधिकारी यांचे खाते क्र.२०४/०१ मधून १५ लाख ७३ हजार ४८७ तर खाते क्र. २०४/०४ या खात्यातून ३१ हजार ५०० रूपये असे एकूण ६३ लाख ३८ हजार ७३२ रूपये हडप केल्याचा पटलेवर आरोप आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांनी चौकशी केली. या प्रकरणात पटले याने अपहार केल्याची बाब लक्षात येताच गटशिक्षणाधिकारी मुनेश्वर मेश्राम (४७) रा.शास्त्री वॉर्ड गोंदिया यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीसांनी भादंविच्या कलम ४०६, ४०८, ४०९, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कनिष्ठ लिपिक पटले सध्या फरार असल्याचे सांगितले जाते.
पोषण आहारातील निधी स्वत:च्या खात्यात
गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर मेश्राम यांनी पाच लाख रुपयाच्या धनादेशवर सही केली होती. तो निधी जि.प. शाळेतील स्वयंपाक करणाऱ्या महिलांचा होता. तसेच स्वयंपाकाकरिता लागणारा भाजीपाला घ्यायचा होता. स्वयंपाकीण महिलांचे मानधन न देता आणि भाजीपाल्याचा निधी संबंधितांना न देता लिपीक सुनील पटले याने आपल्या खात्यात वळता कसा केला याचीही चौकशी जिल्हा परिषद गोंदिया येथील चौकशी समिती करीत आहे.