आरटीई मोफत प्रवेशाची पाचवी प्रतीक्षा फेरी सुरू; ५२ जागा अद्यापही रिक्तच
By कपिल केकत | Published: August 7, 2023 07:41 PM2023-08-07T19:41:10+5:302023-08-07T19:58:47+5:30
आतापर्यंत ८१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण : आणखी ९ विद्यार्थ्यांची निवड
गोंदिया : आरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीतील पाचव्या फेरीला सुरुवात झाली असून, एकूण क्षमतेच्या तुलनेत ५२ जागा रिक्त आहेत. आता यात किती प्रवेश होतात याकडे लक्ष लागले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन सोडत (लॉटरी) ५ एप्रिलला काढण्यात आली होती. जिल्ह्यातील निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक- १, २, ३ व ४ मधील सर्व बालकांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता जिल्ह्यात ७ ऑगस्टपासून पाचवी प्रतीक्षा यादी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पालकांनी दिलेल्या कालावधीमध्ये कागदपत्रांची तपासणी करून पाल्याचा ऑनलाइन प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालकांनी तत्काळ प्रवेश निश्चित करावा
प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक- ४ मधील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगीनमधून अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी. हे अलॉटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून आपल्या बालकांचा ऑनलाइन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेमध्ये जावे आणि प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्याची आकडेवारी
- एकूण शाळा- १३१
- एकूण जागा- ८६४
- एकूण प्रवेश- ८१२
- प्रवेश होणे बाकी- ५२
- आतापर्यंतचे प्रवेश- ८१२
-रिक्त जागेनुसारच संबंधित पालकांना एसएमएस
- प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक- ५ मधील बालकांच्या पालकांना शाळेच्या रिक्त जागेनुसारच एसएमएस पाठविण्यात आले आहेत. पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्रमांक टाकून पाहणे आवश्यक आहे.
- वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व त्या माहितीचा लाभ घ्यावा. पाल्याच्या ऑनलाइन प्रवेशासंदर्भात जर तांत्रिक अडचणी असतील तर कार्यालयात संपर्क करण्याबाबत कळविण्यात आले आहे.