रेल्वे कर्मचाऱ्यांचा अरेरावीपणा

By admin | Published: January 9, 2017 12:55 AM2017-01-09T00:55:11+5:302017-01-09T00:55:11+5:30

नागपूर ते गोंदिया दरम्यान हजारोच्या संख्येत मासिक पासधारक दररोज रेल्वेने प्रवास करतात. अशात

Rule of Railway employees | रेल्वे कर्मचाऱ्यांचा अरेरावीपणा

रेल्वे कर्मचाऱ्यांचा अरेरावीपणा

Next

प्रत्येकी ४०० रूपये दंड : मासिक पासधारकांना तीन तास ठेवले डांबून
गोंदिया : नागपूर ते गोंदिया दरम्यान हजारोच्या संख्येत मासिक पासधारक दररोज रेल्वेने प्रवास करतात. अशात बुधवार (दि.४) एक्सप्रेस गाडी गोंदियाच्या प्लॅटफॉर्म-५ वर थांबताच फलाटावरच सहायक वाणिज्य व्यवस्थापक जायस्वाल यांच्या मार्गदर्शनात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी फलाटावरच मासिक पारधारकांना पकडून त्यांच्याशी अरेरावीपणा केला. तसेच मासिक पासधारक म्हणजे विनातिकीट असल्याचे म्हणत त्यांच्याकडून प्रत्येकी ४०० रूपयांचा दंड वसूल केला.
या घटनेत ज्या मासिक पास धारकांनी दंड देण्यास नकार दिला त्या प्रवाशांसह रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हुज्जत घालून अपमानित केले व तीन तासपर्यंत कार्यवाहीच्या नावे खोलीत डांबून ठेवल्याचे मासिक पासधारक प्रवाशांनी सांगितले. मासिक पासधारक आरक्षित डब्यात बसल्याची शिक्षा म्हणून दंड स्वरूपात ४०० रूपये द्या, नंतरच येथून जा, अशी तंबी त्यांना देण्यात आली. अनेकांनी दंडाची रक्कमही भरली. ज्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांची मात्र चांगलीच फजिती झाली. या प्रकारामुळे मासिक पासधारकांनी रेल्वे प्रशासनावर रोष व्यक्त केला.
नागपूर-गोंदियापर्यंत हजारोच्या संख्येत मासिक पासधारक अपडाऊन करतात. यात शासकीय, निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जनरल डब्यात इतर प्रवाशांची गर्दी राहत असल्याने मासिक पासधारक आरक्षित बोगीतून प्रवास करतात. मासिक पासधारकांसाठी वेगळ्या बोगीची व्यवस्था करावी, अशी मागणी खूप जुनी असूनही रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे आरक्षित बोगीतून त्यांना प्रवास करावा लागतो.
बुधवारी ११.१५ वाजता गाडी फलाटावर थांबताच तिकीट तपासणीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाडीतून उतरणाऱ्या सर्वांचीच चौकशी केली. मासिक पारधारक सांगताच ४०० रूपये दंड द्या, मगच चालते व्हा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशीे तंबी देण्यात आली. त्यामुळे आधीच उशीर झालेल्या पासधारकांनी ४०० रूपये देवून आपली सुटका करून घेतली. मात्र ज्यांच्याकडे पैसे नव्हते व ज्यांनी देण्यास विरोध केला त्यांना जवळपास तीन तासपर्यंत डांबण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले. दरम्यान त्यांनी सोडून देण्याची विनंती केली, मात्र सहायक वाणिज्य व्यवस्थापक जायस्वाल काहीही ऐकायला तयारच नव्हते.
कारवाईला सामोरे गेलेल्या प्रवाशांमध्ये जि.प. पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता, मेडिकल कॉलेजचे विभागप्रमुख, पाटबंधारे विभागाचे अधिकारी-कर्मचारी, जिल्हा रूग्णालयातील अधिकारी-कर्मचारी, बँक कर्मचारी आदी होते. या सर्वांना शिविगाळ व धक्काबुक्की करून रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपली निर्दयता दाखविली. या घटनेमुळे रेल्वेचे कर्मचारी प्रवाशांना कशी वागणूक देतात याची प्रचिती येते. सदर मासिक पारधारकांनी ग्राहक न्यायालयात प्रकरण दाखल करणार असल्याचेही सांगितले आहे. (प्रतिनिधी)

एमएचटीधारकांकडून रोजच वसुली
४नागपूर ते गोंदियादरम्यान प्रवास करणाऱ्या मासिक पासधारकांकडून गाडीतही रेल्वेचे कर्मचारी एकदोन दिवसाआड आरक्षित बोगीत बसले म्हणून दंड स्वरूपात पैसे वसूल करतात. यापैकी अनेकांना पैशाची पावतीसुद्धा दिली जात नाही व पैसा खिशात घातला जातो. तर अनेक प्रवाशांकडून पैसे घेवून एकच कमी रकमेची पावती दिली जाते. याकडे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Rule of Railway employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.