नियम धाब्यावर, चढतो थरावर थर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 06:00 AM2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:16+5:30

दहीहंडी फोडणारे तरूण डीजेच्या तालावर नाचत गात दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करीत असतांना त्याच गटातील काही सदस्य अधिक मज्जा लुटण्यासाठी त्यांच्यावर पाईपच्या माध्यमातून पाण्याचा मारा करतात. त्यात ते तासनतास भिजून दहीहंडी फोडल्यानंतर ते गोविंदा आजारी पडतात.

The rule rises, layer upon layer | नियम धाब्यावर, चढतो थरावर थर

नियम धाब्यावर, चढतो थरावर थर

Next
ठळक मुद्देनियमांचा भंग : जिल्ह्यात तीन वर्षात कुठलीही घटना नाही, तासन्तास भिजल्याने आरोग्यावर परिणाम

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक व्दिगुणित करण्यात येत असला तरी थरारवर थर चढवून विक्रम करण्याच्या नादात अनेक गोविंदा उंचावरून पडून जखमी होण्याची किंवा मृत्यू पावण्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली नाही. तरी ही घटना कधीच घडेल याचा नेम नाही. सुरक्षिततेचे अनेक नियम असून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या तीन वर्षाची माहिती घेतली असता गोंदिया शहरात सुदैवाने कोणत्याही गोविंदाला इजा झाली नाही. दहीहंडी दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत जीवितहानी झाली नाही. तथापि, दुर्घटना टाळण्यासाठीच दही हंडा करा परंतु नियम पाळा असे सांगण्यात येते.
दंही हंडी फोडण्याचा वेगळा उत्साह तरूणाईत दिसून येतो. मोठ्या शहरांप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातही दहीहंडीचे प्रमाण अधिक आहे. छोट्याशा जिल्ह्यात गोंदिया शहरासह तालुक्याच्या ठिकाणी अशा ३९ दहीहंडी गोविंदाच्या माध्यमातून फोडण्यात येणार आहे. यासंदर्भात ३९ मंडळांनी पोलिसांकडे अर्ज देखील सादर केला आहे. दहीहंडी फोडण्याच्या नादात थरावर थर लावण्याची मोठी स्पर्धा गोंदिया जिल्ह्यातही दिसून येते. येथील युवकांचे गटच ती हंडी फोडतात. यासाठी मोठ्या प्रमाणात पुरस्कारही ठेवले जाते. परंतु दहीहंडी फोडतांना कसलीही सुरक्षा बाळगली जात नाही. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीन वर्षांचा आढावा घेतला असता येथील मंडळांच्या खबरदारी घेतल्यामुळे अनुचित प्रकार घडला नसल्याची सुखदायक माहिती आहे.
अपघात नाही परंतु दहीहंडी नंतर तरूण आजारी
गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रृजबाला... असे विविध गाणी डीजेच्या तालावर वाजवित तरूण एकत्र येऊन दहीहंडी फोडण्यासाठी मानवी श्रृंखला तयार करतात. एका थरावर दुसरा थर करीत ३० ते ४० फूटांपर्यंत एकमेकांवर थर उभा करून उंचावर टांगलेल्या दहीहंडी रस्त्यावर फोडण्यासाठी तासनतास रस्ता बंद केला जातो.
दहीहंडी फोडणारे तरूण डीजेच्या तालावर नाचत गात दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करीत असतांना त्याच गटातील काही सदस्य अधिक मज्जा लुटण्यासाठी त्यांच्यावर पाईपच्या माध्यमातून पाण्याचा मारा करतात. त्यात ते तासनतास भिजून दहीहंडी फोडल्यानंतर ते गोविंदा आजारी पडतात. त्यांनी प्रकृतीची काळजी घेत आनंद लुटण्याची गरज आहे.

दहीहंडीसाठी सुरक्षिततेची नियमावली आहे त्याचे पालन सर्व मंडळांनी करणे आवश्यक आहे. न्यायालयाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. लहान मुलांना सर्वात वरील थरावर नेणे टाळावे. नियम तोडणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
- मंगेश शिंदे,
पोलीस अधीक्षक गोंदिया.

भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही १० ते १२ फुटांवरच दही हंडी ठेवून आनंद द्विगुणीत करतो. अपघात होऊ नये याची खबरदारी घेतो. फोर्सने पाणी मारले जात नाही. श्रीकृष्ण मूर्ती विसर्जन दरम्यान मिरणूक वाजत-गाजत काढली जाते.
- लोकेश उर्फ कल्लू यादव,
दहीहंडी संघरक्षक, कृष्णपुरा वॉर्ड गोंदिया.

अशी आहे नियमावली
- १८ वर्षाखालील गोविंदाचा सहभाग नसावा.
- २० फुटापेक्षा अधिक उंच दहीहंडी नसावी.
- सुरक्षिततेची उपकरणे अत्यावश्यक.
- मानवी मनोऱ्यावर पाण्याचा मारा करु नये.
- कच्च्या,जुन्या इमारतीला दहीहंडी बांधू नये.
- कायदा सुव्यवस्थेची खबरदारी घ्यावी.
- दहीहंडीच्या ठिकाणी कर्कश डिजेचा वापर शक्यतो टाळावा.
- गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपात्कालीन व्यवस्था असावी.

Web Title: The rule rises, layer upon layer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.