जनधनचे पैसे परत जाणार अफवेने बँकेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:00 AM2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:00:18+5:30
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. रोजगार नसल्यामुळे गोरगरिबांना दोन वेळचे भोजन मिळणे कठीण झाले आहे. अशा काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खाते उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यावर पुढील तीन महिने प्रती महिना ५०० रुपये जमा करण्यात येणार आहे. यातंर्गत एप्रिल महिन्याची रक्कम बँकेकडे वर्ग करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे गोरगरिबांच्या चुली पेटणे कठीण झाले आहे. बाहेर रोजगार नसल्याने पैसा आणायचा कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत शासनस्तरावर महिलांच्या जनधन खात्यात ५०० रुपये जमा करण्यात आले. परंतु कुणीतरी अफवा पसरविली की जनधन खात्यातील रक्कम परत जाणार म्हणून मंगळवारी (दि.७) महिलांनी बँकेत एकच गर्दी केली होती. यामुळे बँक कर्मचारी आणि पोलिसांची सुध्दा चांगलीच दमछाक झाली.
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. रोजगार नसल्यामुळे गोरगरिबांना दोन वेळचे भोजन मिळणे कठीण झाले आहे. अशा काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खाते उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यावर पुढील तीन महिने प्रती महिना ५०० रुपये जमा करण्यात येणार आहे. यातंर्गत एप्रिल महिन्याची रक्कम बँकेकडे वर्ग करण्यात आली आहे. खातेदारांची गर्दी टाळण्यासाठी बँकेच्या वेळापत्रकानुसार खातेदारांना रक्कम काढता येईल. बँकेत गर्दी करू नये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले होते. अशातच ५ व ६ एप्रिलला सुट्टी असल्याने बँकेचे व्यवहार बंद होते. याच दरम्यान कुणीतरी अफवा पसरविली की जनधन खात्यातील रक्कम परत जाणार आहे. या अफवेने बँक परिसरात गर्दी उसळली होती. तसेच कुणी संजय गांधी निराधार योजनेचे, तर कुणी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे काढण्यासाठी मंगळवारी बँकेत गर्दी केली होती. यामुळे बँकेच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. भर उन्हात पैसे परत जाणार या अफवेने गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र पाहयला मिळाले. गर्दी नियंत्रीत करण्यासाठी बँक कर्मचारी व पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. भारतीय स्टेट बँकचे प्रभारी व्यवस्थापक चंद्रशेखर सुखदेवे, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक एस.बी.बोरकर यांनी सांगितले जनधन योजनेच्या लाभार्थ्यांनी अफवांना बळी पडू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. जनधन योजनेतील ज्यांचा खात्यावर जमा झालेली रक्कम त्यांना मिळेल असे लोकमतशी बोलताना सांगितले.