भरधाव ट्रकची पिकअपला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:21 AM2018-02-28T00:21:00+5:302018-02-28T00:21:00+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय ते बालाघाट रोडवरील पांगोली मार्गावरील राजभोज चौकात भरधाव वेगात असलेल्या ट्रकने पिकअप ला धडक दिली.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : जिल्हाधिकारी कार्यालय ते बालाघाट रोडवरील पांगोली मार्गावरील राजभोज चौकात भरधाव वेगात असलेल्या ट्रकने पिकअप ला धडक दिली.यात पिकअप चालकासह तिन जण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.२७) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
जखमींमध्ये शुभम शैलेश मडामे (२१), रा. नवरगाव कला, प्रविण बबलू कुसराम २०, रा. शिवणी हट्टा व आशिष शेषराव जगताप (२२) रा. चुलोद यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार एम एच ३५ के २३९९ क्रमांक पिकअप वाहन पांगोलीकडून गोंदियाच्या दिशेने येत होता. दरम्यान बालाघाटकडून भरधाव वेगात येत असलेल्या ट्रकने पिकअपला धडक दिली. यामुळे पिकअप वाहन रस्त्याखाली उलटल्याने चालकासह इतर दोघे जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी घटना स्थळाला भेट देऊन जखमींना केटीएस रुग्णालयात भरती केले. जखमींवर योग्य उपचार करण्यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांच्याशी चर्चा केली.
मागील काही दिवसांपासून बायपास मार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या मार्गावरील अपघाताच्या घटना टाळण्यासाठी या चौकात तात्काळ गतिरोधक तयार करण्याची सूचना बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांना केली.
या वेळी बंटी पंचबुद्धे, चंद्रभान तरोने, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील, दुलीचंद बुद्धे, अमित बुद्धे, देवेश मिश्रा उपस्थित होते. बायपास मार्गावर गतीरोधक नसल्याने या चौकात यापूर्वी देखील अपघाताच्या घटना घडल्या आहेत. उशीरा का होईना पालिकेने त्याची दखल घेतली.