‘त्या’ अनाथ मुलीच्या लग्नाचा उचलला भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 09:21 PM2019-04-12T21:21:21+5:302019-04-12T21:21:55+5:30
समाजामध्ये आजही सामाजिक बांधिलकी जपून अन्यायग्रस्त व अनाथांना भरभरुन मदत करुन त्यांच्या चिंतामय चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी त्यागाची भूमिका स्वीकारणाऱ्या महानुभाव दानदात्यांची कमी नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : समाजामध्ये आजही सामाजिक बांधिलकी जपून अन्यायग्रस्त व अनाथांना भरभरुन मदत करुन त्यांच्या चिंतामय चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी त्यागाची भूमिका स्वीकारणाऱ्या महानुभाव दानदात्यांची कमी नाही. ग्राम मांडोखाल येथील एका अनाथ मुलीच्या लग्नासाठी मदतीच्या आवाहनावरून जिल्ह्यातून अनेक दानदात्यांनी त्या अनाथ मुलीच्या वैवाहिक सुखी जीवनासाठी पुढे येऊन भरभरुन मदतीचा हात दिला. सामाजिक कार्यकर्ता प्रा. डॉ. सविता बेदरकर यांनी दानदात्यांच्या मदतीने त्या अनाथ मुलीच्या लग्नाचा भार उचलून आवश्यक ते साहित्य मुलीच्या घरपोच केले.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ज्यांच्या जन्मदात्या मायबापांचे छत्र हिरावून अनाथ होऊन जवळच्या नातलगांच्या सहायाने जीवन जगत आहे. अशा २० अनाथ मुला-मुलींना अन्नधान्यासह ईतर साहित्य पुरविण्याचे काम ‘लोकमत’ प्रतिनिधी अमरचंद ठवरे व डॉ. बेदरकर यांच्या सहकार्याने नियमित सुरू आहे. ग्राम मांडोखाल येथील ज्योती घनशाम ठाकरे या अनाथ मुलीचा येत्या १७ एप्रिल रोजी विवाह होऊ घातला आहे. तिच्या लग्न कार्यासाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून वृत्त प्रकाशित करुन वेळोवेळी मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यावरून जिल्ह्यातील अनेक दानदात्यांनी भरभरुन प्रतिसाद देत सर्वोतोपरी मदत केली.
ज्योतीच्या लग्न कार्यासाठी डॉ. बेदरकर यांनी गोंदिया येथील अनेक दानदात्यांकडून तांदूळ, गहू, दाळ, तेल, मिरची पावडर, मसाला, हळद, जेवणाचे साहित्य यासह नवरदेवाला कपडे व मुलीला साड्या इत्यादी वस्तू मांडोखाल येथे आणून दिल्या. गोंदिया येथील मंजुषा कार्लेकर, रामनगरचे ठाणेदार देशमुख, मनिषा नशिने, आरती चवारे, वैशाली कोहपरे, सुनंदा भुरे, श्रीखंडे, डॉ. भूषण मेश्राम, चोयराम गोपलानी, लटारे, राखी ठाकरे, विश्वदीप डोंगरे, मुन्ना यादव, भुजबळ, सुषमा देशमुख, प्रा. बागडे, अंजली सिरस्कर, शर्मिला पाल, निलीमा कुथे, शामकुवर, शालू तिरपुडे, योगा क्लब, नशिने, कल्याणी खोब्रागडे, मंदा गायधने, विठ्ठल भरणे, शोभना पटेल, दिनेश उके इत्यादींनी मदतीमध्ये सहभाग नोंदवला.
ज्योतीला इंडेन गॅस कनेक्शन अशोक चांडक बंधू, गोदरेज कपाट एस.एस. जे. महाविद्यालयातील प्रा. डॉ. कल्पना सांगोडे, कुलर बाजीराव तुळशीकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव नेवारे, बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष सोनदास गणवीर, बाजार समितीचे सचिव अशोक काळबांधे, सडक-अर्जुनी येथील शिक्षक अनिल मेश्राम, कठाणे यांनी जिवनोपयोगी साहित्य भेद दिले. येत्या १७ एप्रिल ला अनाथ ‘ज्योती’ वैवाहिक जिवनात पदार्पण करणार आहे. विवाहप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी प्रा. सविता बेदरकर तसेच गोंदियाचे समाजसेवी, प्रा. डॉ. कल्पना सांगोळे, सोनदास गणीवर, अनिल मेश्राम उपस्थित राहणार आहेत. ज्योतीच्या मदतीसाठी व तिचे वैवाहिक जीवन सुखी संपन्न जाण्यासाठी दानदात्यांनी पुढे येण्याचे आवाहन ठवरे यांनी केले आहे.