सालेकसा नगर पंचायत येणार विकासाच्या प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 09:02 PM2018-07-22T21:02:40+5:302018-07-22T21:03:53+5:30
विकासाच्या बाबतीत कोसो दूर असलेल्या सालेकसा नगर पंचायतला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी मागील काही दिवसांपासून नगराध्यक्ष आणि त्यांचे सहकारी धडपड करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आले असून शासनाने पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : विकासाच्या बाबतीत कोसो दूर असलेल्या सालेकसा नगर पंचायतला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी मागील काही दिवसांपासून नगराध्यक्ष आणि त्यांचे सहकारी धडपड करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आले असून शासनाने पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे आठ महिन्यांपूर्वी नव्याने स्थापित झालेली नगर पंचायत विकासाच्या प्रवाहात येणार आहे.
डिसेंबर २०१७ मध्ये नगर पंचायतमध्ये प्रथमच नगराध्यक्ष व नगर पंचायत कमिटीची स्थापना झाली. तेव्हापासून मागील शिल्लक रकमेतून लहानमोठी कामे केली जात होती. त्यातून स्थानिक नागरिकांच्या ज्वलंत समस्या दूर होत नव्हत्या. ही व्यथा नगराध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आ. संजय पुराम यांच्याकडे मांडली. यावर आ.पुराम यांनी निधी मिळवून देण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरवा केला. यात त्यांना यश आले असून अर्थमंत्र्यांनी सालेकसा नगर पंचायतच्या विकासासाठी पाच कोटी रुपये मंजूर करुन तसे पत्र पुराम यांना सोपविले.
आ.पुराम यांनी त्वरित नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाºयांना पाचारण केले व त्यांना निधी मंजुरीचे पत्र सोपविले. त्यामुळे नगर पंचायतचे पदाधिकारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केला. मिळालेल्या निधीतून नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येईल. यामध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, स्वच्छता, वीज व्यवस्था, नाली बांधकाम यासह विविध सोयीसुविधा पुरविण्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
आ. पुराम यांच्या सहकार्यामुळे नगर पंचायतला पाच कोटींचा निधी उपलब्ध झाल्याबद्दल नगराध्यक्ष विरेंद्र उईके, उपाध्यक्ष प्रल्हाद वाढई, बांधकाम सभापती उमेदलाल जैतवार, गणेश फरकुंडे यांनी त्यांचे आभार मानले.
नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, हे लोकप्रतिनिधींचे प्रथम कर्तव्य आहे. त्या दिशेने आपले सतत प्रयत्न असतात. यासाठी आपण शासन दरबारी सतत झटत असतो. त्या प्रयत्नांना यश मिळून शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे.
-संजय पुराम,
आमदार, आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र.